मुंबई : शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरा करणार आहेत. देशभरातील सर्वाधिक जास्त आत्महत्या महाराष्ट्रात व त्यातही कापूस उत्पादक पट्टा असलेल्या विदर्भात झाल्या आहेत. केंद्र सरकारने कापसावरील आयात कर रद्द केला आहे. त्यामुळे यंदा आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाच्या नेत्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.

दर्जेदार कापूस उत्पादन करणारा प्रदेश म्हणून विदर्भाची जगभरात ओळख आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे मुळातच कापूस पीक अडचणीत आले आहे. त्यात भर म्हणून केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (एआयडीसी) रद्द केला आहे. अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर ५० टक्के कर लादला आहे. या सर्व परिस्थितीचा वाईट परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे यंदा विदर्भात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांच्या विदर्भ दौऱ्याला महत्त्व आले आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. दिल्ली येथे झालेल्या आंदोलनातील शेतकरी नेते महाराष्ट्रात संयुक्तरीत्या पहिल्यांदाच दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे नेते ही या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत.

दौऱ्यात या नेत्यांचा समावेश

संयुक्त किसान मोर्चाच्या या दौऱ्याची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी वर्धा येथील गांधी आश्रम या ठिकाणावरून होणार आहे. डॉ. अशोक ढवळे, विजू कृष्णन, राकेश टिकैत, युधवीर सिंग, पी. कृष्णप्रसाद, के. डी. सिंग, राजन क्षीरसागर, तजिंदरसिंग विर्क, रामिंदर सिंग पटियाला, गुरमीत सिंग मेहमा, राजेंद्र बावके, अनिल त्यागी, ॲड. शिव सिंग, उद्धव शिंदे, किशोर ढमाले, गोपीनाथ कांबळे, सुशीला मोराळे, ममिदला बिक्सापती, मांडला वेंकण्णा, दासू बालेसाहेब, सुखविंदर सिंग औलख, सतीश आझाद, शशी कांत, विजय जावंधिया, एस. व्ही. जाधव, माधुरी खडसे, शालिनी वानखेडे या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

अमरावतीत शेतकरी मेळावा, अकोल्यात परिसंवाद

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथे संयुक्त किसान मोर्चाची पत्रकार परिषद होईल. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी या दिवशी अमरावती जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला असून, संयुक्त किसान मोर्चाचे नेते मेळाव्यात सहभागी होतील. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अकोला येथे परिसंवादाचे आयोजन केले असून, महाराष्ट्रभरातून राजू शेट्टी, बच्चू कडू, प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत.