मुंबई : विरार – दादर जलद लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मीरा रोड आणि दहिसर रेल्वे स्थानकांदरम्यान ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. नाथू हंसा (३५) असे या तरुणाचे नाव आहे.
चेहरा ओळखण्याच्या प्रणालीच्या मदतीने (फेस रिकग्निशन सिस्टीम) त्याचा शोध घेऊन अटक करण्यात आली. मूळचा गुजरातमधील असलेला नाथू मुंबईत बहिणीकडे आला होता. महिलांच्या आकर्षणापोटी तो लोकलमध्ये शिरला होता.
विरारमध्ये राहणारी ३२ वर्षीय स्वरा भोसले ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अंधेरीला जात होती. तिने विरार स्थानकातून संध्याकाळी ६ ची विरार – दादर लोकल पकडली. ती लोकलच्या पहिल्या महिला डब्यातून (चर्चगेट बाजूने) प्रवास करीत होती. महिलांच्या डब्यात तुरळक गर्दी होती. मिरा रोड स्थानक गेल्यानंतर महिला डब्या शेजारी असलेल्या मालवाहू (लगेज) डब्यात चढलेल्या तरुणाने महिलांच्या डब्यात डोकावून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली.
खिडकीजवळ बसलेल्या तीन तरुणी या प्रकाराने घाबरून दुसरीकडे जाऊन बसल्या. त्यानंतर त्या तरुणाने रागारागाने लोकलच्या डब्याच्या पत्रावर जोरजोराने बुक्के मारायला सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे महिलांच्या डब्यात भितीचे वातावरण पसरले होते. अंधेरी स्थानक येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. स्वराने या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि ते समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले.
१३ दिवसांनी गुन्हा दाखल
या घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी स्वराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बोरिवली रेल्वे पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ (स्त्रीच्या शीलाचा अपमान करणारे किंवा तिच्या गोपनीयतेत घुसखोरी करणारे शब्द, कृती, हावभाव), तसेच रेल्वे कायद्यातील कलम १४५ (ब) (रेल्वेच्या परिसरात त्रास देणे, अश्लील वर्तन करणे, किंवा शिवीगाळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
‘फेस रिकग्निशन सिस्टीम’च्या मदतीने अटक
आरोपीची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. आम्ही त्याचे छायाचित्र चेहरा ओळखणाऱ्या प्रणालीमध्ये (फेस रिकग्निशन सिस्टीम) टाकण्यात आले. त्यानंतर तांत्रिक तपास करून त्याची ओळख पटली. नाथू हंसा (३५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे. तो मूळचा गुजरातमधील असून मुंबईत राहणार्या बहिणीकडे तो दोन दिवसांपूर्वी आला होता. महिलांच्या आकर्षणापोटी तो लोकलमध्ये शिरला होता. त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
काय आहे फेस रिकग्निशन सिस्टीम ?
‘फेस रिकग्निशन सिस्टीम’ ही एक तंत्रज्ञान प्रणाली आहे. संगणक किंवा मोबाइल कॅमेऱ्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा चेहरा स्कॅन करून त्याची ओळख पटवते. यात कॅमेरा प्रथम चेहरा टिपतो, मग त्या चेहर्याचे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण बिंदूच्या (डोळ्यांमधील अंतर, नाकाचा आकार, ओठांची रचना, जबड्याची रचना) आधारे नकाशा तयार करतो. त्यानंतर हा नकाशा आधीपासूनच्या डेटाबेसमध्ये जतन केलेल्या चेहऱ्यांशी जुळवून ती व्यक्ती कोण आहे ते ओळखतो.