Mumbai Maharashtra Rain Alert Today: मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभगाने केले आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस पडणारा पाऊस हा वळिवाचा पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे.
मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा प्रभाव राहील. त्यामुळे बुधवारपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका राहील. तर, कही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर
वादळी वारे, विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम
वादळी वारे, विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
महाराष्ट्र किनाऱ्यापासून ७५ किमी बुधवारपासून ते रविवारपर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर आणि त्याच्या बाहेर ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळेपुढील पाच दिवस मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.