मुंबई : सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. बहुतांश भागात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, आज विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार आज विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भाबरोबरच घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सध्या पावसाला पोषक वातावरण नसल्याने पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय

वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून, दिल्ली, सतना, दाल्तोंगंज, जमशेदपूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ऊन सावल्यांचा खेळ

कोकण तसेच विदर्भात पावसाचा अंदाज जरी असला तरी इतर भागात मात्र ऊन सावली राहणार आहे. या भागात ढगाळ वातावरण राहील तसेच अधूनमधून हलक्या सरी बरसतील. पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज कुठे

कोकण

रायगड, रत्नागिरी

मध्य महाराष्ट्र

पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर

विदर्भ

अकोला, अमरावती, नागपूर,भंडारा,गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली , यवतमाळ, वाशिम

कोकण विदर्भात पाऊस

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, तसेच विदर्भात मात्र अधूनमधून सरी बरसत आहेत. पुढील दोन – तीन दिवस कोकण, विदर्भात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसाची उघडीप

राज्याच्या इतर भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसाची पुढील काही दिवस तरी उघडीप राहील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर या भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबईची स्थिती काय ?

मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. यापुढील काही दिवस मुंबईत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुसळधार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २९ जुलैपर्यंत ३६७.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७८५.९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.