मुंबई : मागील दोन – तीन दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भातही अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल आणि लगतच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हे क्षेत्र पुढील दोन दिवसांत झारखंड आणि उत्तर छत्तीसगडकडे सरकणार आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून गोव्यापर्यंत समुद्रकिनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या स्थितीमुळे गुरुवारपर्यंत कोकण, विदर्भ आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर राहील. कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यानंतर गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरेल, अशी माहीती हवामान विभागाकडून देण्यात आली. यानुसार कोकणासह घाट परिसरात बुधवारी पावसाचा जोर राहील.

याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोकण, तसेच घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

२४ तासांत २०८.६ मिमी पावसाची नोंद

मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर आहे. याचबरोबर विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० दरम्यानच्या २४ तासांत २०८.६ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाचा अंदाज कुठे अतिमुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)

रायगड, पुणे घाट परिसर, नाशिक घाट परिसर, चंद्रपूर

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा