मुंबई : वर्क फ्रॉम होम संस्कृती, सतत स्क्रीनसमोर बसून काम, झोपेचे अयोग्य तास, असंतुलित आहार आणि ताणतणाव या सर्वांचा परिणाम आयटी उद्योगातील तरुण कर्मचाऱ्यांच्या हृदयावर थेट होत आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त (२९ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशभरातील मागील पाच वर्षांची आकडेवारी समोर येताच हे संकट स्पष्ट झाले आहे.
‘इंडियन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार भारतात हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल २५ टक्के मृत्यू ४० वर्षांखालील तरुणांमध्ये होत आहेत आणि त्यात आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. आयसीएमआर-एनसीडी रिसर्च २०२३ च्या माहितीनुसार २०१८ मध्ये तरुण आयटी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण ७ टक्के होते ते वाढून २०२२ मध्ये थेट १३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आयटी हब म्हणजेच बंगळुरू आणि पुणे येथील रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत आयटी क्षेत्राशी संबंधित हृदयविकाराच्या रुग्णांत तब्बल ६० टक्के वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२३ या कालावधीत ३० ते ४५ वयोगटातील आयटी कर्मचाऱ्यांच्या हृदयविकारामुळे आकस्मिक रुग्णप्रवेशांत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आयटीमधील लोकांना १०-१२ तास संगणकासमोर बसून काम करावे लागते, अपुरी झोप आणि फास्ट फूड संस्कृती यामुळे तरुण वयोगटात कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह वेगाने वाढतो आहे आणि हे तिन्ही घटक हृदयविकाराचे मुख्य कारण ठरत असल्याचे मुंबईतील ह्रदयविकार तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी सांगितले.
आयटी क्षेत्रातील ४०-४५ वर्षांखालील अनेक तरुण हृदयविकाराच्या झटक्यामुळे आपत्कालीन विभागात दाखल होतात. यासर्वांशी बोलताना एक लक्षात आले ते म्हणजे त्यांना असलेली धुम्रपानाची सवय तसेच कामाचा ताण. नोकरीमधील अस्थिरता हाही एक प्रमुख भाग आहे ज्यामुळे तणावाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते.
परदेशस्थ कंपन्यांमध्ये भारतातून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक विचित्र असते. ही मंडळी तेथील वेळेनुसार येथे रात्रभर काम करतात आणि दिवसा झोपतात. यातूनच मग खाण्यापिण्यापासूनचे सर्व वेळापत्रक बदलते ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरारवर होत असल्याचे डॉ रत्नपारखी म्हणाले. याचा विचार करता एकूणच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनांपासून शंभर टक्के दूर राहाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संतुलित आहार व व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट २०२३ नुसार भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी २८ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. यामध्ये १५ टक्के मृत्यू थेट तरुण कामगारांमध्ये होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतातील आयटी कर्मचाऱ्यांचा सरासरी कामाचा कालावधी आणि तणाव पातळी विदाशातील अनेक देशांपेक्षा २० टक्के जास्त असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालही दाखवतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते आयटी कंपन्यांनी आता कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम, नियमित हेल्थ चेकअप, योगा, ध्यान आणि शारीरिक व्यायामाला प्रोत्साहन देणे हीच खरी काळाची गरज आहे. अन्यथा पुढील दशकात आयटी क्षेत्र हृदयविकाराची राजधानी ठरेल असा इशारा आयसीएमआरच्या संशोधनात देण्यात आला आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हे स्पष्ट होते की ‘यंग इंडिया’चे धडधडणारे हृदय धोक्यात आले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील तरुण कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम स्वीकारणे हाच खरा उपाय ठरेल