आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर सोमय्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यातच आज (११ एप्रिल) मुंबई सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता ‘नॉट रिचेबल’ का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “हा कमळाचा चिखल गेला कोठे? प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता का ‘नॉट रिचेबल’ झाला. आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं.”

“किरीट सोमय्या भोंगा घेऊन बोंबलणार, मग सगळे भाजपात विलीन होणार”

“अनेकांनी मला प्रश्न केला की भोंगा कोणाला झोपवू देत नाही. खरं म्हणजे ज्या भोंग्यांनी लोकांना झोपू दिले नाही ते भाजपात गेले आणि आता शांत झोपले आहेत. याचा अर्थ किरीट सोमय्या भोंगा घेऊन बोंबलणार, मग सगळे जाऊन भाजपात विलीन होणार आणि नंतर दुसऱ्यांच्या मागे लागणार. माझा प्रश्न थेट आहे, की हा कमळातील चिखल गेला कोठे?” असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारत सोमय्यांना टोला लगावला.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. विक्रांत या युद्धनौकेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.

चर्चगेट येथे २०१३ मध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते विक्रांत वाचवा असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून युद्धनौका विक्रांत संग्रहालय असे लिहिलेल्या पेटय़ांमधून चर्चगेट स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले  यांनी त्या वेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले. पुढे  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकणार असल्याचे त्यांना समजले. जानेवारी २०१४ मध्ये  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकण्यात आले. सर्व भाग अंदाजे ६० कोटी रुपयांना विकण्यात आले, तसेच ते सर्व भाग आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑनलाइन लिलावाद्वारे विकत घेतल्याची माहिती  भोसले यांना वर्तमानपत्राद्वारे समजली.

दरम्यान, धिरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार  भोसले ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : “निरव मोदी, विजय मल्लयाप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होताच किरीट सोमय्या…”, काँग्रेसचा विक्रांत घोटाळ्यावरून गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar criticize kirit somaiya over ins vikrant corruption case pbs