मुंबई : मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे २५० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. याव्यतिरिक्त मध्य रेल्वे ४४ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीचा विस्तार आणखी दोन सेवा वाढवून केला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या २९६ वर पोहचली आहे.

गाडी क्रमांक ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील. तर, गाडी क्रमांक ०११३२ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील.

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीची दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल. गणपती विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०११३१ चे आरक्षण ३ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांच्या ३६ फेऱ्या

गाडी क्रमांक ०११३३ मेमू विशेष रेल्वेगाडी २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १.४० वाजता दिवा येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता खेड येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीच्या एकूण १८ सेवा चालविण्यात येतील. तर, गाडी क्रमांक ०११३४ मेमू विशेष रेल्वेगाडी २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान दररोज सकाळी ८ वाजता खेड येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या धावतील. या रेल्वेगाड्यांना निळजे, तळोजा पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा असेल.

दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार

गाडी क्रमांक ०११५५/०११५६ दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०११५५ दिवा – चिपळूण विशेष रेल्वेगाडीची एक फेरी आणि गाडी क्रमांक ०११५६ चिपळूण – दिवा विशेष रेल्वेगाडीची एक फेरी वाढविण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्यांऐवजी आता एकूण ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत चालवण्यात येणार आहेत.