मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पारा नऊ अंशांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी (२७ नोव्हेंबर)नगरमध्ये राज्यात सर्वांत कमी ९.४ तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत नाशिक, नगर, पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा झंझावात वेगाने राज्यात येत असल्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. बुधवारी नगरमध्ये सर्वांत कमी ९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पुण्यात ९.९, जळगाव ११.०, सातारा १२.०, औरंगाबाद १२.२, परभणी ११.६, नागपूर ११.७, गोंदिया ११.९ आणि अकोल्यात १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबईत दाखल, जाणून घ्या, देशातील कोणत्या शहरात मिळणार

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि मध्य महाराष्ट्रातील पुण्यात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या नंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा येऊन थंडी काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. पण, सध्यातरी पुढील दोन दिवस थंडीत काहिशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather updates cold wave nashik ahilyanagar pune mumbai print news css