मुंबई : येत्या महापालिका निवडणुकीत महायुती सर्व जागा लढणार आणि १५० पेक्षा जास्त जागा जिंकेल. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असून महायुतीपैकी कोणत्याही पक्षाचा महापौर असला तरी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच ध्येयधोरणांनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे लागेल, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे. जागावाटपाचे कोणतेही सूत्र नसून महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील यानुसारच संधी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई भाजप अध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेले आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून यावेळी महापालिकेवर महायुतीचाच महापौर निवडून आणण्यासाठी भाजप आणि महायुतीने पूर्ण तयारी केली आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती.

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती असा थेट सामना होणार आहे. परंतु, त्यातही महायुतीमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटप कसे असेल, जिंकून आल्यास महापौर पद कोणाकडे असेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तसेच भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये जागावाटपावरून निवडणुकीपूर्वी वाद होण्याचीही शक्यता आहे.

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आधीच महापौर पदावरून भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे मुंबईत नक्की काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच अमित साटम यांनी सावध प्रतिक्रिया देत महापौर कोणाचाही असला तरी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच ध्येय धोरणांनुसार काम करावे लागेल असा सूचक इशारा दिला आहे.

‘मेट्रो ३’चा महायुतीला फायदा

कुलाबा – सीप्झ दरम्यानच्या प्रवासासाठी ‘मेट्रो ३’ सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मतदार महायुतीवर खूष असून महायुती मोठ्या संख्येने विजयी होईल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून आम्ही सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, बीडीडी वसाहत, अभ्युदय नगर वसाहत यांच्या पुनर्विकास असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. विरोधी पक्षाने केलेले एकतरी काम सांगावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. सागरी किनारा मार्गाची संकल्पना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती हे मान्य करतो. पण त्यांनी एक तरी परवानगी आणली का, असा सवाल साटम यांनी केला. भाजपने या प्रकल्पासाठीच्या सर्व परवानगी मिळवल्या, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला, असेही ते म्हणाले.

११ वर्षांचा विकास आणि २५ वर्षांचा भ्रष्टाचार

या महापालिका निवडणुकीसाठी आम्ही विकासाचे मुद्दे आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन मतदारांकडे जाऊ, असेही ते म्हणाले. गेल्या ११ वर्षांत भाजपने केलेला विकास आणि गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने केलेला भ्रष्टाचार आम्ही मतदारांसमोर मांडू. महापालिकेत ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची युती होती, मात्र तेव्हा भाजपने कधीच ७० पेक्षा जास्त जागा लढवल्या नव्हत्या. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या ३० ते ३२ होती. मुंबई महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत भाजपला विशेष स्थान नव्हते. त्यामुळे या भ्रष्टाचारात भाजपचा वाटा नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

जागावाटपाचे सूत्र नाही…जिंकून येण्याची क्षमता हवी

महापालिकेच्या २२७ जागा महायुती लढवील, पण भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचे कोणतेही सूत्र नाही, असे मत साटम यांनी व्यक्त केले. कोणत्या प्रभागात कोण निवडून येण्याची क्षमता आहे. माजी नगरसेवक असला तरी त्याच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे का, त्याच्यापेक्षा अधिक क्षमता असलेला उमेदवार आहे का, कोणाला त्या प्रभागातील प्रश्नांची जाण आहे याचाही विचार उमेदवारी देताना केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौरांनी अधिकाराचा वापर करायचा असतो

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत महापौरांचे सगळे अधिकार हे मातोश्रीवरच होते. महापौर हे पद म्हणजे केवळ कठपुतळी नाही तर त्यांना अधिकार असतात आणि ते वापरावे लागतात, असाही टोला साटम यांनी हाणला.