मुंबई: महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढले आहे. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यासह मुंबईत मलेरिया-डेंग्यू व चिकनगुन्याचे संकट गडद होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे तर गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील बहुतेक भाग जलमय झाला असून लेप्टोस्पायरोसिसचा धोकाही यंदा वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

यंदा मे महिन्याच्या शेवटाला म्हणजे मुदतपूर्व मुसळधार पाऊस राज्यात कोसळला असल्यामुळे मुंबई, नागपूर, ठाणे तसेच गडचिरोली भागात साथीच्या आजारांचा फटका बसणार हे स्पष्ट झाले होते. प्रामुख्याने मुंबई-ठाणे शहरात वारेमाप होणारे बांधकाम आणि ते कमी ठरावे म्हणून सिमेंटच्या रस्त्यांची काढलेली व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे जागोजागी पाणी साचून साथींचा उद्रेक होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत सर्दी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून करोनाचे रुग्ण कोणते व साथीच्या आजाराचे रुग्ण कोणते हे ओळखणेही अवघड झाले आहे. गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या नागरी जीवनाची पुरती वाताहात झाली असून त्यापाठोपाठ आता आरोग्याच्या समस्याही डोके वर काढतील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डेंग्यू, मलेरियाबरोबरच यंदा लेप्टोस्पायरोसिससाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, असे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्याचे रुग्ण आगामी काळात वाढलेले दिसतील. खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. मलेरिया रुग्णांची संख्या गेल्या वर्षी २८५२ होती ती वाढून यंदा साडेपाच हजार मलेरियाचे रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. विशेषतः धारावी, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि भायखळा परिसरांमध्ये अनियमित कचरा व्यवस्थापन व साचलेले पाणी यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. एका वरिष्ठ पालिका आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “पाणी साचणाऱ्या ठिकाणी अॅनॉफिलिस डासांची उत्पत्ती वाढली असून तेच मलेरियाचा प्रमुख स्त्रोत आहे. डेंग्यूचे रुग्ण गेल्या वर्षी ९६६ होते ते आज पंधराशे नोंदविण्यात आले आहेत तर चिकनगुन्याच्या रुग्णांची संख्या यंदा हजार झाली आहे.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. प्लेटलेट्स घटण्याचे प्रमाण व शारीरिक अशक्तपणा यामुळे रुग्णांना तातडीने हॉस्पिटलायझेशनची गरज भासत आहे. वांद्रे, अंधेरी, मलाड, कांदिवली या मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक आढळले आहेत. डेंग्यूची लक्षणे – उष्णतेसह ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि त्वचेवर रॅशेस – यामुळे नागरिक अधिक चिंतेत आहेत. सुमारे दोन वर्षांनी चिकनगुनियाचे रुग्ण पुन्हा शहरात आढळू लागले आहेत. यंदा आतापर्यंत हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बऱ्याच जणांना संधीवातासारखी लक्षणे, तीव्र सांधेदुखी आणि थकवा जाणवत आहे. “सध्या चिकनगुनियावर उपचार नाहीत, फक्त लक्षणांवर आधारित उपचार करावा लागतो. त्यामुळे लोकांनी स्वतःहून दक्ष राहणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.

महानगरपालिका दरवर्षी डास नियंत्रण मोहीम राबवत असली तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम फारसा जाणवत नाही. अनेक भागांत दैनंदिन फॉगिंग होत नाही, साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने डासांच्या उत्पत्तीला खतपाणी मिळते आहे. पालिकेकडून काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, तसेच घरघरी जाऊन सर्वेक्षणही सुरु आहे. मात्र गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे उपाययोजनांना फारसा अर्थ राहिलेला नाही.मुंबईतील पावसाळा केवळ ट्रॅफिक आणि पाणथळ रस्त्यांपुरता मर्यादित राहत नाही तर तो आरोग्याच्या दृष्टीनेही मोठे संकट उभे करतो. डासजन्य आजारांवर नियंत्रणासाठी पालिका यंत्रणा आणि नागरिक दोघांचीही सक्रिय भूमिका अत्यावश्यक आहे. अन्यथा आगामी काळात ही साथ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पावसाच्या लवकर आगमनामुळे यंदा शहरात संसर्गजन्य आजारांनी आधीच डोके वर काढले आहे.डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड व गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे ठाण्यातील डॉ पराग देशपांडे यांंनी सांगितले.सामान्यतः जूनमध्ये डेंग्यू रुग्णांची वाढ लक्षात येत नाही. मात्र, या वर्षी मे महिन्याच्या अखेरीसच अनेक रुग्ण ताप व अंगदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.टायफॉइड व गॅस्ट्रोएन्टेरायटिसचे रुग्ण देखील वाढच्याचे डॉ देशपांडे म्हणाले.प्रामुख्याने मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असलेल्यांनी पावसाळी आजारांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.यंदा पावसाळी आजार मोठ्या प्रमाणात होणार हे चित्र आता स्पष्ट असल्याचे डॉ देशपांडे यांनी सांगितले.