मुंबई / छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातूनच माघार घेतली. तसेच १७ दिवसांपासून चालवलेले उपोषण समाप्त करून साखळी उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली. दुसरीकडे, जरांगे यांची विधाने आणि आंदोलनाचे इशारे याविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकार विरुद्ध जरांगे पाटील असे चित्र तयार झाल्यानंतर सोमवारी मराठवाडय़ातील तीन जिल्ह्यांत जाळपोळ, आंदोलने करण्यात आली तर, हे लोण अन्यत्र पसरू नये यासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येच्या कटाचा आरोप करून जरांगे रविवारी मुंबईकडे निघाले. मात्र, रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत  कायदा व सुव्यवस्था पाळण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू केली तसेच काही ठिकाणी जमावबंदीही लागू केली. यामुळे जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील भांबेरी गावातून माघार घेतली. तेथून ते आपल्या आंतरवली सराटी गावात गेले आणि उपोषण सोडल्याची घोषणाही केली.

हेही वाचा >>>मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानच्या हिंसेच्या घटनांची उच्च न्यायालयाकडून दखल, सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही

 सध्या परीक्षांचा काळ असल्याने जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलन मोडून काढण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.  जरांगे यांनी प्रत्येक गावात दररोज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याआधारे बीड जिल्ह्यात शिरूर कासार व अंमळनेर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर राज्यभरात गेल्या काही महिन्यांत एक हजार ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.  मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान गेल्या काही दिवसांत सुमारे ८० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी किरकोळ स्वरूपाचे ३६ गुन्हे आहेत.

हेही वाचा >>>निवडणुकीतूनच आव्हान? मराठा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा; आंदोलकांचे मौन

सरकार विरुद्ध जरांगे संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मराठवाडय़ाच्या काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी गावात जमवाने एसटी बस पेटवून दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यांतील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून त्याचा फटका सामान्य व्यवहारांनाही बसत आहे.

आता पुन्हा साखळी उपोषण

पुन्हा जनतेत जाऊ, असे सांगत जरांगे यांनी सतराव्या दिवशी उपोषण स्थगित केले. उपचारानंतर पुन्हा गावोगावी जाऊ तेव्हा समाजबांधवांनी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करू नये किंवा मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. उपोषण स्थगित होत असले, तरी आंतरवाली सराटी येथे चौघांचे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दहा टक्के नको, तर ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. त्यासाठी सरकारने ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

‘मर्यादेबाहेर गेल्यावर कार्यक्रम’

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समोरासमोर आले. तेव्हा ‘सरकारचे हे काय चालले आहे’ असा सवाल पटोले यांनी खेळीमेळीत बोलताना केला. त्यावर ‘मर्यादेबाहेर गेल्यावर करेक्ट ‘कार्यक्रम’ करतोच,’ असे सूचक वक्तव्य शिंदे यांनी हसतहसत केले. त्यावर ‘तुम्हीच या जरांगेना मोठे केले’, अशी टिप्पणी पटोले यांनी केली. 

‘रास्ता रोको’ करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा आवाहन करणे हा गुन्हा आहे. त्याअंतर्गत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. –नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड

जनता आणि पोलिसांत काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मी आंतरवाली सराटी येथे परतण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची आणखी नाराजी ओढवून घेऊ नये. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.  – मनोज जरांगे-पाटील

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil returned from jalna district on monday maratha reservation amy
Show comments