मुंबई : राज्यात शुक्रवापरासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल.दरम्यान, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काही भागात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. काही भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यातच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगानुसार राज्यातील काही नद्यांना आधीच पूर आला आहे. अशातच शुक्रवारपासून पावसाचे प्रमाण वाढणार असून काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिकांचेही नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी
मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मागील दोन दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस मराठड्ड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागपूर येथे सर्वाधिक तापमान
राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, एकीकडे तापमानाचा पारा वाढला आहे. नागपूर येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तेथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अमरावती येथे ३३.४ अंश सेल्सिअस, वर्धा ३४.१ अंश सेल्सिअस, वाशिम ३१.२ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.