मुंबई : आमदार निवासातील उपहारगृहाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी समज दिली आहे. गायकवाड यांच्या वर्तनाचा निषेध करीत विरोधकांनी बुधवारी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर टॉवेल व बनियन घालून निदर्शने केली.
शिळे अन्न दिल्याबद्दल गायकवाड यांनी उपहारगृह कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्याची ध्वनिचित्रफीत प्रसिध्दीमाध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा आमदार निवासात हा प्रकार घडल्याने आणि हा परिसर विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद सभापती यांच्या अखत्यारित येत असल्याने ते निर्णय घेतील, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले होते.
गायकवाड यांनी अयोग्य वर्तन केल्याबद्दल त्यांना समज देणारे पत्र विधिमंडळ सचिवालयाने पाठविले असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले. गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्यावर अन्य कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
एवढे सारे होऊनही आमदार गायकवाड यांनी मारहाणीचे समर्थन केले होते.
बनियानवर विरोधकांची निदर्शने
गायकवाड यांच्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. मारहाण करताना गायकवाड हे टॉवेल व बनियनवर होते. त्यामुळे विरोधकांनी टॉवेल व बनियन परिधान करुन ‘ चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो, ’ अशा घोषणा दिल्या. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सतेज पाटील आदी त्यात सहभागी झाले होते.
पडळकर-आव्हाड यांची बाचाबाची, शिवीगाळ
भाजपचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारात जोरदार बाचाबाची व शिवीगाळ झाली. पडळकर गाडीचा दरवाजा बंद करीत असताना तो लागल्याने आव्हाड यांनी जाब विचारला आणि वाद वाढून भांडण झाले. पडळकर यांना बघून घेण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला.