मुंबई : ‘वाट पाहिन, पण एसटीनेच जाईन’ असे विश्वासाने म्हणणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. एसटीची अवेळी बस सेवा, नादुरूस्त बस आणि त्यातच एसटीने केलेली भाडेवाढ यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. एकूणच परिस्थितीमुळे आता प्रवासी एसटीकडे पाठ फिरवू लागले आहेत. परिणामी, गेल्या अडीच महिन्यांत एसटीच्या प्रवाशांची संख्या २०.६२ लाखाने कमी झाली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत एसटीमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत बसची संख्या वाढविण्यात आली. मात्र एप्रिल – जून २०२५ या कालावधीत प्रवाशांच्या संख्या सातत्याने कमी होत आहे. परिणामी, जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देणे एसटीला शक्य होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. १ एप्रिल ते १५ जून हा एसटीसाठी गर्दीचा हंगाम असतो. या हंगामात एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. या कालावधीत लग्नसराई, शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडलेल्या असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी वाहतूक होते.
मागील वर्षी बसची संख्या कमी होती. मात्र उत्पन्न आणि प्रवासी संख्या जास्त होती. तुलनेने यावर्षी ताफ्यात सुमारे एक ते दीड हजार बस दाखल झाल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नामध्ये आणि पर्यायाने प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. परंतु एप्रिल २०२४ आणि एप्रिल २०२५ या दोन महिन्यांच्या तुलनेत १५ लाख ६० हजार प्रवासी कमी झाले. तसेच मे २०२४ आणि मे २०२५ या दोन महिन्यांच्या तुलनेत १५ लाख आणि १ जून २०२४ आणि १ जून २०२५ या दोन महिन्यांच्या तुलनेत २० लाख प्रवासीसंख्या कमी झाली आहे. तर, मे २०२५ आणि जून २०२५ या दोन महिन्यांची तुलना केली असता प्रवासीसंख्या पाच लाखाने कमी झाली आहे.
राज्यभरात एसटीचे एकूण ३१ विभाग व २५१ आगार आहेत. यापैकी काही विभाग आणि आगार सातत्याने तोट्यात आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, नागपूर यांसारखे मोठे विभाग सातत्याने तोट्यात आहेत. फायद्यात असणाऱ्या आगार व विभागांचे कौतुक करायचे व दुसऱ्या बाजूला तोट्यात असलेल्या विभागांना व आगारांना कारणे दाखवा नोटीस पाठवायची, असे एसटी महामंडळात सुरू आहे. तोट्यातील आगारांसाठी एसटी प्रशासनाने ठोस असे काही केलेले नाही. परिणामी, १५ टक्के भाडेवाढ होऊनही एसटी सातत्याने तोट्यात आहे, असे मत एसटी कर्मचारी संघटनेने व्यक्त केले आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या १,५०० बस दाखल होऊन सुद्धा ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न व प्रवासी मिळविण्यात व्यवस्थापनाला यश आले नाही. आता पावसाळा सुरू झाला असून, आता योग्य नियोजन करून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. – श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस.
याबाबत अधिक माहिती घेऊन, उचित उपाययोजना केल्या जातील. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.