मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल २९० कृत्रिम तलाव तयार करून मुंबई महापालिकेने स्वत:चे कौतुक करून घेतले असले तरी या दहा दिवसांच्या विसर्जनसाठी लाखो लिटर पाणी वापरण्यात आले. विहिरीतून पाण्याचा उपसा करून टॅंकरद्वारे ते कृत्रिम तलाव भरण्यात आले होते. नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाला बंदी घातल्यामुळे महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली होती.
पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तर सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली होती. गेल्यावर्षी २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यांची संख्या यंदा २९० करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने तलाव तयार करण्यात आल्यामुळे दहा दिवसात लाखो लिटर पाणी या कृत्रिम तलावात वापरण्यात आले होते.
लाखो लिटर पाणी
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत एकूण किती पाणी लागले याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. खासगी टॅंकर चालक व मालकांनी या कृत्रिम तलावांना पाणी पुरवठा केला होता. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कृत्रिम तलाव लहान आणि मोठ्या आकाराचे होते. त्यामुळे लहान तलावात एकावेळी पाच ते सहा टॅंकर पाणी भरावे लागत होते. तर मोठा तलाव असल्यास सात ते आठ टॅंकर पाणी ओतावे लागत होते. त्यामुळे सरासरी एका तलावासाठी पन्नास हजार लिटर पाणी एका दिवसाला लागत होते.
मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईत २९० तलाव तयार केले होते. तसेच दीड दिवसांचे, पाच दिवसांचे, सहा आणि सात दिवसांचे व दहा दिवसांचे असे चार दिवस विसर्जन पार पडले. त्यामुळे तब्बल लाखो लिटर पाणी या विसर्जनासाठी लागले असल्याची शक्यता टॅंकर चालकांनी व्यक्त केली आहे. या कृत्रिम तलावासाठी टॅंकर चालकांनी आपला पारंपरिक जलस्रोत म्हणजेच विहिरी, बोअर वेल येथून हे पाणी आणले होते.
पीओपीच्या हट्टापायी पाण्याचा आणि पैशांचा अपव्यय
पर्यावरणपूरक मूर्तींसाठी आग्रह धरणारे मूर्तीकार वसंत राजे यांनी यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पीओपीच्या लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले जातात. पीओपीच्या हट्टासाठी करदात्या नागरिकांच्या पैशांचा हा अपव्यय असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. त्यामुळे मूर्तींची उंची कमी करणे व पर्यावरणपूरक साहित्याच्या मूर्ती घडवणे हाच उपाय असल्याचा पुनरुच्चार राजे यांनी केला.