मुंबई : तरुणांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवी दिल्ली येथून अटक केली. निलेश राठोड असे या आरोपीचे नाव आहे. त्याने ६० हून अधिक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आरोपी निलेश राठोड महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करीत होता. त्यासाठी तो स्वत:ला सनदी अधिकारी असल्याचे भासवत होता. राज्य आणि केंद्रात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी ५ ते १५ लाख रुपये घेत होता. वैद्यकीय चाचणी, बोगस नियुक्ती पत्र देऊन तो दिशाभूल करीत होता. याबाबत मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिल्लीतून अटक

आरोपी अतिशय धूर्त आणि चलाख आहे. तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. त्याच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्याची पत्नी दिल्लीत रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि त्यांचे सहकारी मंदार राणे, सचिन निकम दिल्लीत पोहोचले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून सापळा रचून राठोडला दिल्लीच्या द्वारका मोड परिसरातून अटक करण्यात आली.

१० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

आरोपी निलेश राठोड (३३) अकोला जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रहिवासी आहे. तो पूर्वी सीआयएसएफमध्ये कार्यरत होता. त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यांने २०२२ नंतर शेकडो तरूणांची अशाप्रकारे फसवणूक केली आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या आलेल्या तक्रारीनुसार त्याने सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मात्र फसवणुकीची रक्कम १० कोटींच्या घरात जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

आरोपीविरोधात आर्थिक गुन्हे शाखा (मुंबई), आझाद मैदान पोलीस ठाणे (मुंबई), डेक्कन पोलीस ठाणे (पुणे), अकोला, वाशी (नवी मुंबई), तसेच इतर अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यात तो फरार होता. मुंबईतील पोलीस ठाण्यात ६० पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

फसवणुकीच्या पैशांतून मराठी सिनेमाची निर्मिती

आरोपीचे राहणीमान उच्च होते. त्याच्याकडे फसवणुकीतील कोट्यवधी रुपये जमा व्हायचे. हा पैसा तो छानशौकीसाठी वापरत होता. या पैशांतून त्याने दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली होती, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित्त गोयल, सहाय्यक आयुक्त राजेश ओझा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीला अटक केली.