मुंबई : बहुमजली इमारतीच्या उद्वाहकात १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या २९ वर्षीय आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी इमारतीत उद्वाहक चालक म्हणून काम करत असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पीडित मुलगी त्याच इमारतीत कुटुंबियांसोबत राहते. पीडित मुलगी इमारतीमधील निवासस्थानी जात असताना आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलगी बाजूला गेली असता आरोपी पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. घरी जाऊन तिने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी तात्काळ याप्रकरणी आरोपीविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याप्रकरणी भायखळा पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रविवारी आरोपीला माझगाव परिसरातून अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ
मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्याअंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत २०२४ मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांची उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचित व्यक्ती आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते.