मुंबई : मुंबईमधील रखडलेल्या अनेक रेल्वे प्रकल्पांमुळे दररोज रेल्वे प्रवाशांना निरनिराळ्या समस्यांचा सामना करावा लागत असून दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि असुरक्षितता यामुळे प्रवाशांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागत आहे. मुंबई उपनगरीय मार्गावरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या कामांना वेग देण्यात आला असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर भविष्यात प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सरकारने १६,२४१ कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांच्या १२ प्रकल्पांना मंजुरी दिच्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच लोकसभेत दिली. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर उत्तर सादर करताना ते बोलत होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) विविध प्रकल्पांमुळे मध्य, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवांचा चेहरा बदलणार आहे.
रेल्वे प्रकल्प का रखडले
मुंबईतील रेल्वे प्रकल्प निधी अभावी, भूसंपादन, नागरिकांचे पुनर्वसन आदी विविध अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे रखडले आहेत. याबाबत वैष्णव म्हणाले की, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर यावर्षात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून आधुनिकीकरण, स्थानिक रेल्वे मार्गांची जोडणी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे लोकल सेवांची वारंवारता वाढविता येईल आणि मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे शक्य होईल.
मुंबईकरांना मिळणार नव्या वातानुकूलत लोकल
गेल्या काही वर्षांमध्ये लोकलमध्ये गर्दी वाढली असून अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करावा लागत आहे. प्रवासी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. परिणामी प्रवासादरम्यान धोके वाढत आहेत. प्रवासादरम्यान अपघातांमुळे काही प्रवाशांना प्राणही गमवावा लागतो, तर काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व येते. यावर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजे असलेल्या वातानुकूलित लोकल चालवण्यात येत आहेत.
या लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होत असून, दरवाजातून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण शून्य आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी, गर्दीमय प्रवासापासून सुटका करण्यासाठी नवीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे लक्ष्य आहे. २३८ नवीन वातानुकूलित लोकलचे रेक सुरू करण्यात येणार आहेत. स्वयंचलित दरवाजांमुळे प्रवाशांना लोकलच्या पायदानावर लटकण्यापासून किंवा धावत्या लोकलमध्ये चढण्या-उतरण्यापासून रोखणे शक्य होणार आहे. लोकल सुरू होताच दरवाजे बंद होतात आणि लोकल थांबल्यानंतर उघडतात. त्यामुळे प्रवासी लोकलमधून पडण्याचा धोका कमी होतो, असे रेल्वेमंत्री म्हणाले.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रकल्प
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-II) सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी (१७.५ किमी) ८९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-II) मुंबई सेंट्रल-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी (३० किमी) ९१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) गोरेगाव-बोरिवलीपासून हार्बर मार्गिकेच्या विस्तारासाठी (७ किमी) ८२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी (२६ किमी) २,१८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) विरार-डहाणू रोड तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी (६४ किमी) ३,५८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेसाठी (२९.६ किमी) २,७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) ऐरोली-कळवा उन्नत उपनगरीय मार्गिकेसाठी (३.३ किमी) ४७६ कोटी रुपये खर्च अपेक्षि्त
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेसाठी (३२ किमी) १,७५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी (१४ किमी) १,५१० रुपये खर्च अपेक्षित
– कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी (६७ किमी) ७९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड मार्गिकेसाठी (६ किमी) १७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित
– निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिकेसाठी (५ किमी) ३३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित