मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी आरक्षणाची सोडत येत्या ११ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आपल्या प्रभागाचे चित्र स्पष्ट होणार आहे. इच्छुक उमेदवारांचे लक्ष या आरक्षणाकडे लागले आहे. आरक्षण निघाल्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय पातळीवर जागावाटपांच्या प्रकियेला वेग येणार आहे. तसेच उमेदवारांच्या फोडाफोडीलाही आणि पक्ष बदलालाही वेग येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात तिसऱ्यांदा आरक्षणाची सोडत निघणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी संध्याकाळी मुंबई महापालिका निवडणूकीच्या आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाबाबत अधिसूचना काढली आहे. यापूर्वी ९ ऑक्टोबरला राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याच्या पद्धतीबाबतची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याच्या प्रयोजनार्थ आगामी होणारी निवडणूक ही पहिली निवडणूक म्हणून ग्राह्य धरण्याबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे यावेळी आधीचे आरक्षण विचारात न घेता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे.

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पार पाडत आहे. मतदार याद्या प्रभाग निहाय फोडण्याच्या कामाला वेग आलेला असताना आता आरक्षणाचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या निवडणूकीसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे व त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप करण्याच्या अनुषंगाने या अधिसूचनेत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूकीची आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष सोडत काढल्यानंतर निकाल जाहीर करणे आणि त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम आरक्षणाची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. तर अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २ , इतर मागासवर्गासाठी ६१ जागा राखीव असतात. या राखीव जागांमधील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात.

एकूण प्रभाग …२२७

महिला ….११४ (५० टक्के)

अनुसूचित जाती …१५

अनुसूचित जमाती …२

इतर मागास वर्ग …६१

तिसऱ्यांदा आरक्षण सोडत कशी

मुंबई महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपण्याच्या आधीच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची संख्या २३६ केली होती. या २३६ प्रभागांची आरक्षण सोडत ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आली होती. त्यावेळी इतर मागासवर्ग आरक्षणाशिवाय ही सोडत काढण्यात आली होती. मग राज्यात जून २०२२ ला सत्तांतर झाल्यानंतर जुलै २०२२ मध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले. तेव्हा पुन्हा एकदा २९ जुलै २०२२ रोजी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवकांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे खूप विरोध झाला होता. मात्र नंतर शिंदे -फडणवीस यांच्या सरकारने प्रभागांची संख्या पुन्हा २२७ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता निवडणूक होत असून आता पुन्हा एकदा आरक्षण सोडत निघणार आहे.