मुंबई : मुंबई, विदर्भातील वर्धा, यवतमाळ-वाशीम, रामटेक, सांगली या मतदारसंघांवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. वंचितच्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. जागावाटपावर मंगळवारी अंतिम तोडगा निघेल, असा दावा काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

राज्यातील ४८ पैकी ३९ जागांवर महाविकास आघाडीत सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. याचाच अर्थ अद्यापही नऊ जागांवर एकमत झालेला नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य- मुंबई या मतदारसंघांवर काँग्रेसना दावा केला आहे. भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी आणि काँगेस या दोघांनी दावा केल्याने या जागेचा तिढा सुटलेला नाही.

हेही वाचा >>> “एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावं”, रक्षा खडसेंचं विधान चर्चेत, म्हणाल्या, “वरच्या पातळीवर…”

महाविकास आघाडीत शिवसेना २० किंवा २१ जागा, काँगेस १९ किंवा २० जागा तर राष्ट्रवादीला नऊ वा दहा जागा मिळतील असे सांगण्यात येते. वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यात आले असले तरी वंचितला किती आणि कोणत्या जागा सोडण्यात येतील यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

कमी जागा स्वीकारू नयेत, काँगेस नेत्यांची भूमिका

टिळक भवन येथे आज काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, आघाडीच्या मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोकसभेच्या ४८ पैकी ३६ जागांवर आघाडीत मतभेद नाहीत. उर्वरित १२ जागा मित्रपक्षांना कोणत्या सोडायच्या व कोणत्या जागांवर आगामी बैठकीत दावा करायचा यावर चर्चा करण्यात आली. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ आणि विद्यामान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबई हे दोन्ही मतदारस काँग्रेससाठी अनुकूल असल्याने त्यांची पक्षाने आघाडीच्या बैठकीत मागणी करावी, अशी भूमिका मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मांडली.