राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे सुरू आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्षांत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेही पुन्हा भाजपावासी जाणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तशीच इच्छा व्यक्त केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. तसंच, याबाबत त्यांनी खुलासाही केला होता. “गेल्या काही दिवसांपासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार, अशा आफवा पसरवल्या जात आहे. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने हे केलं जात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे आणि राहीन. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.
हेही वाचा >> अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
एकनाथ खडसे यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला असला तरीही त्यांनी भाजपात यावं असं त्यांच्या कुटुंबातील लोकांचीच इच्छा असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपात आले तर आनंदच
रक्षा खडसे म्हणाल्या, “गेल्या काही दिवासंपासून बरेचसे इतर पक्षाचे मोठे नेते भारतीय जनता पक्षात यऊ लागलेले आहेत. नाथाभाऊंबद्दल मी काही सांगू शकत नाही. कारण हा वरच्या पातळीवरचा विषय आहे. या पक्षांतराबाबत नाथाभाऊंचं काय मत आहे, हे स्पष्ट झालं तरच सगळं समजू शकेल. परंतु, एक कार्यकर्ता म्हणून आणि अनेकांची इच्छा आहे म्हणून एकनाथ खडसे यांनी येथे येऊन काम केलं तर लोकांना आनंद होणार आहे.”