मुंबई : मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून, शहरातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा कायम राहणार असून काही भागांत मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकण आणि घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दक्षिण मुंबई, मध्य उपनगर, आणि पश्चिम उपनगरातील काही भागांत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर होता. याचबरोबर पहाटेपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. दादर, वरळी, परळ, प्रभादेवी, भायखळा, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही आज पावसाची तीव्रता अधूनमधून वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर आता पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकण तसेच घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. याचबरोबर विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात पावसाचा जोर फारसा नसेल. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. त्यानंतर मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी हरियाणा, राजस्थान, पंजाबच्या काही भागात वाटचाल केली. बिकानेर, रामपूर, अनुपनगरपर्यंतच्या भागात मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्यानंतर शनिवारी मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. मैसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने पुढील दोन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कमी दाबची शक्यता

गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याचबरोबर बंगालादेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.

पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर शनिवारी सकाळी ८:३० ते रविवारी सकाळी ८:३० पर्यंत झालेली पावसाची नोंद

कुलाबा उदंचन केंद्र – १०.६५ मिमी

नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र – १५.८ मिमी

मुंबई महानगरपालिका कार्यालय- १८.८ मिमी

मेमनवाडा अग्निशमन केंद्र – १३.२१ मिमी

मलबार हिल – १३.७१ मिमी

भायखळा अग्निशमन केंद्र – ८.८८ मिमी

ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ -१४ मिमी

शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा- १५ मिमी

रावळी कॅम्प- २२.८६ मिमी

दादर अग्निशमन केंद्र – १६.७५ मिमी

आदर्श नगर शाळा, वरळी- २६ मिमी

एफ वॉर्ड कार्यालय – २४.८९ मिमी

प्रतीक्षा नगर – २०.२ मिमी

कलेक्टर कॉलनी, चेंबूर -२४ मिमी

मालाड डेपो- ११.४ मिमी

कांदिवली अग्निशमन केंद्र – १३.२१ मिमी

मागाठाणे बस स्थानक – १५ मिमी