मुंबई : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन गतिमान दळणवळणावर भर देत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने नांदेड आणि राजधानी मुंबई अधिक जवळ आले असून त्यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आरंभ झाला.
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून आरंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना व इतर अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारख्या आरामदायक सुविधा असलेली, भारतात निर्माण झालेली वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. या गाडीमुळे मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९.३० तासात पूर्ण होईल. पूर्वी जालन्यापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत जाईल. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १,४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डबे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नांदेड हे शीख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तेथे भेट देणाऱ्या प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून मिळेल. दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे असतील.
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस
– मराठवाड्यातील नांदेडला मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस.
– नांदेड ते मुंबई असा ६१० किमीचा प्रवास ९ तास ३० मिनिटांत पूर्ण, इतर रेल्वेगाड्यांच्या तुलनेत प्रवासाच्या कालावधीत मोठी बचत
– राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवास
– हुजूर साहिब नांदेडवरून बुधवार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत एक्स्प्रेसची सुविधा प्रवाशांना मिळेल.
– नियमित प्रवास करणारे प्रवासी, भाविक, अधिकारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त.
– पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीस्कर