मुंबई : राज्याच्या कृषी विभागाने तब्बल ३८ वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाने नवीन बोधचिन्हाचे तसेच शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी, या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ – भरणे

महाराष्ट्राची शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या बोधचिन्हामधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे ‘नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त व्हावे यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन समावेशित करण्यात आले.

कला महाविद्यालयातील आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, कलाकार, डिझायनर्स, लेखक, अधिकारी, कर्मचारी आणि अन्य इच्छुक व्यक्तींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यात एकूण ७६१ बोधचिन्ह आणि ९४९ घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले.

अंतिम निवड समितीने शासनास प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केली, ज्यापैकी एकाची निवड शासनाने केली. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि याचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ) आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई (परभणी) यांचे कृषी विभागातर्फे कृषीमंत्री भरणे यांनी अभिनंदन केले.

भविष्यातील वापर आणि अधिकार

या नव्या उपक्रमामुळे कृषी विभागाची दृश्य ओळख अधिक सशक्त होणार असून, यापुढे कृषी विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये हे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाणार आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य कृषी विभागाचे असून, त्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.