मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे प्रवास आणखी जलद करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला असून आतापर्यंत या प्रकल्पाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होईल असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत होते. मात्र हा मुहूर्त चुकला असून मुंबई-पुणे प्रवास मिसिंग लिंकद्वारे अतिजलद प्रवास करण्यासाठी प्रवासी-वाहनचालकांना मार्च २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल. मात्र त्यानंतर या मार्गिकेच्या चाचण्या, तपासणी करण्यात येणार असून त्या यशस्वी झाल्यानंतरच ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आता एमएसआरडीसीने मार्च २०२६ चा नवा मुहूर्त धरला आहे.
मुंबई – पुणे अंतर अडीच तासात पार करता यावे यासाठी ९४.५ किमी लांबीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला. या महामार्गावरून आज मोठ्या संख्येने वाहने धावत असून राज्यातील सर्वात महत्त्वाचा, वर्दळीचा म्हणून हा महामार्ग ओळखला जातो. मात्र हा महामार्ग आता अपुरा पडू लागला असून दुसरीकडे अपघताची भीतीही वाढली आहे. भविष्यातील वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने या महामार्गाच्या आठपदरीकरणासह खोपोली – कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन मिसिंग लिंकच्या कामास सुरुवात करण्यात आली.
या प्रकल्पामुळे खोपोली – कुसगावदरम्यानचा सहापदरी मार्ग आता आठपदरी होणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवासात आणखी ३० मिनिटांची बचत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि नवीन मार्गिका केव्हा सेवेत दाखल होणार याकडे मुंबईकरांचे, पुणेकरांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता या मार्गिकेवरून प्रवास करण्याची प्रतीक्षा आणखी काही महिन्यांसाठी वाढली आहे. एमएसआरडीसीने डिसेंबर २०२५ अखेर हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होईल, असे जाहीर केले होते. मात्र आता यासाठी मार्च २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल. मात्र या मार्गिकेच्या काही तपासणी आणि चाचण्या कराव्या लागणार आहेत. डोंगर-दऱ्यांतून ही मार्गिका जात असल्याने आवश्यक त्या चाचण्या आणि तपासणी जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर मार्च २०२६ अखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल केली जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मिसिंग लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. ॲफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पावसाळा आणि वाऱ्याचा वेग अधिक असताना काम करणे अशक्य होत असून त्यामुळे कामास विलंब होत असल्याचेही एमएसआरडीसीकडून सातत्याने सांगितले जाते.
यामुळेच या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीच्या अनेक तारखा चुकल्या आहेत. डिसेंबर २०२२, जून २०२३, जानेवारी २०२४, मार्च २०२४ अशा अनेक तारखा देण्यात आल्या. त्यानंतर २०२५ मध्येही काही तारखा देण्यात आल्या असून डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती. मात्र आता तीही चुकली असून मार्च २०२६ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुलै २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी करून ऑक्टोबर २०२५ मध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले होते. पण आता हा मुहूर्त टळला असून आता डिसेंबरचाही मुहूर्त टळण्याचीच शक्यता आहे.