मुंबई : नकली शिवसेनेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसैनिकांना धोका दिला असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाळासाहेबांनी कायम विरोध केला. पण उद्धव ठाकरे हे घुसखोरीचे समर्थन करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीलाही धोका दिला, अशा शब्दांत मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसला मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मतांचा जिहाद करणाऱ्या अल्पसंख्याकांना द्यायचे आहे. पण धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. त्यामुळे मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा डाव म्हणजे संविधानाचा अपमान आहे. मी संविधान रक्षक असून हा डाव कदापीही यशस्वी होऊ देणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचारासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर महाविजय संकल्प सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. गर्दीने खचाखच भरलेल्या शिवाजी पार्कवर मोदी यांनी ‘मत (व्होट) जिहाद’ हाणून पाडून २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदानाचे आवाहन केले. मत देताना मुंबईवरील हल्ल्यांच्या घटना आठवून शहिदांचा अवमान करणाऱ्यांविरोधात मत द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

जनादेश मोडून सरकार

ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, जनादेश मोडून ठाकरे यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि अयोध्येतील राममंदिराला विरोध करणाऱ्यांबरोबर गेले. अन्य देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, बौद्धांना देशाचे नागरिकत्व देण्यास म्हणजे सीएएलाही ठाकरे यांनी विरोध केला. आपल्या विचारधारेत एवढे परिवर्तन झालेला दुसरा पक्ष आढळणार नाही. मुंबईतील विकास प्रकल्पांमध्येही ठाकरे यांनी अडथळे आणले. बुलेट ट्रेन, मालवाहतूक कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्पांसह जनहिताचे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प रोखले. ते आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सुरू केले आहेत.

हेही वाचा >>> दुषणास्त्रांचा वर्षाव ; शिवाजी पार्कोत रालोआचे, बीके सीमध्ये ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन

स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर ठाकरे आज आहेत. स्वा. सावरकरांचा आयुष्यात कधीही अवमान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी जाहीर करावे, असे आव्हान मोदी यांनी दिले. काँग्रेसचा माओवादी जाहीरनामा अंमलात आणण्याचे ठरविले, तर देश दिवाळखोरीत जाईल, असेही मोदी म्हणाले.

ठाकरे हिंदुत्व विसरले फडणवीस

शिवाजी पार्कवर सभेची सुरुवात करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो व मातांनो’, असे संबोधन करीत होते. कडवट हिंदुत्वाचे विचार या मैदानावरून दिले गेले. पण उद्धव ठाकरे आता ही भाषा विसरले आहेत. ही शोकांतिका आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मोदी उवाच

● अशक्य ते शक्य करून आम्ही अनुच्छेद ३७० कब्रस्तानात गाडले

● देशात पुन्हा राज्यघटनेचे अनुच्छेद ३७०लागू करण्याचे स्वप्न पाहू नये

● महात्मा गांधींच्या सूचनेनुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर देशाची पाच दशके फुकट गेली नसती

● मुंबई हे स्वप्नपूर्तीचे शहर, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मत देऊन मला मदत करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams uddhav thackeray in shivaji park rally zws