मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज, शनिवारी सायंकाळी सहानंतर खाली बसणार आहे. राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीची युद्धभूमी असलेल्या मुंबईत शुक्रवारी सायंकाळी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मुंबई, ठाण्यातील दहा जागांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी जागांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्क येथे महायुतीची तर वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानात इंडिया-महाविकास आघाडीची सभा पार पडली. शिवाजी पार्क येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे लक्षवेधक ठरली तर ‘इंडिया’ आघाडीच्या सभेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आदी नेत्यांची भाषणे झाली.
रालोआच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ‘इंडिया’च्या नेत्यांवर जोरदार घणाघात केला. महाराष्ट्रात जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडीने सरकार बनविले, तेव्हा मेट्रो, बुलेट ट्रेनसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प अडवून ठेवले आणि मुंबईकरांचे नुकसान केले असा आरोप त्यांनी केला. मुंबईला तिचा हक्क परत देण्यासाठी आज येथे आलो आहोत, असे मोदी म्हणाले. देशाच्या विकासात स्वप्नांची नगरी असलेली मुंबई मोठी भूमिका बजावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. गांधीजींचा सल्ला ऐकून काँग्रेसचे विसर्जन केले गेले असते, तर आज देश पाच दशके पुढे गेला असता असा दावाही त्यांनी केला. ‘ काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची भाषा काही जण करीत आहे. मात्र जगातील कोणत्याही शक्तीला आता अनुच्छेद ३७० आणणे शक्य होणार नाही,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीमधील सर्व पक्षांचे तमाम ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा >>> ‘ते उद्या ‘संघा’लाही नकली म्हणतील!’
दुसरीकडे ‘इंडिया’च्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, खरगे, केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर कडाडून हल्लाबोल केला. ‘ही पहिली अशी निवडणूक आहे, जिच्यात नरेंद्र मोदींना प्रचारासाठी मुद्दाच नाही. त्यांना असा उन्माद होता की, काहीही केले तर जनता ऐकेल. पण ‘अब की बार, भाजप तडिपार होईल’ असे ठाकरे म्हणाले. मोदींना हटविल्याशिवाय हा ‘भटकता आत्मा’ स्वस्त बसणार नाही, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.
नेहरूंचे नाव आणि पाच मागण्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर प्रथमच उपस्थित असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ अशी केली. नेहरू यांच्याप्रमाणेच मोदीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी पुढे व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आपण काय करू शकतो, याबद्दल बोलावे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, लोकलसेवा अधिक सक्षम करावी आदी पाच मागण्याही राज यांनी केल्या.
सावरकर स्मारक, चैत्यभूमीला भेट
पंतप्रधानांनी मुंबईत येताच दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तिथून जवळच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकालाही पंतप्रधानांनी भेट दिली.