मुंबई : पश्चिम उपनगरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर शाळेतील मदतनीस महिलेला (केअर टेकर) अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी चार वर्षांची असून ती पश्चिम उपनगरातील नामांकीत शाळेत शिक्षण घेत आहे. सोमवारी तिच्या आजीने तिला नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आणले. तिचे कपडे बदलत असताना मुलगी अस्वस्थ दिसली. मुलीने वेदना होत असल्याची तक्रार केली. हे ऐकल्यावर कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर मुलीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान तिच्यावर लैगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मदतनीस महिलेला अटक

पोलिसांनी याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून बुधवारी शाळेत काम करणाऱ्या ४३ वर्षीय मदनीस महिलेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या महिला कर्मचाऱ्याची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली नाही. याशिवाय, शाळेतील आणखी तीन महिला सहाय्यक कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

आरोपी महिलेला गुरूवारीसत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासत असून घटनेची खातरजमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही संवेदनशील बाब असल्याने आम्ही शाळेच्या महिला मदतनीस महिलेला (केअरटेकर) अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.