मुंबई : अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील १२५ वर्षांहून अधिक जूना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. त्यानुसार गणेशोत्सवानंतर, १० सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता १० सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता नाही. कारण पूल बंद करून पाडकाम करण्याचा कोणताही अंतिम निर्णय मुंबई वाहतूक पोलीस वा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घेण्यात आलेला नाही.

या पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या दोन इमारतींसह आसपासच्या १९ इमारतीतील रहिवाशांनी पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावल्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही किंवा पाडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीएकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते आहे. मात्र त्यामुळे प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर पडत असून त्याचा फटका वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या पूर्णत्वास बसला आहे.

वरळी-शिवडी उन्नत रस्ता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून प्रभादेवी येथून पुढे शिवडीकडे जाणार आहे. त्यासाठी सध्याचा ब्रिटीशकालीन १२५ वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी द्विस्तरीय पूल एमएमआरडीएकडून बांधला जाणार आहे. जुना पूल पाडून नवीन पुलाच्या कामास सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीए कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये हा पूल वाहतुकीस बंद करून पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला.

मात्र या दोन्ही वेळा रहिवाशांच्या विरोधामुळे एमएमआरडीएला पूल बंद करून पाडकाम करता आले नाही. एप्रिलमध्ये पूल बंद करण्यास वाहतूक पोलीस गेले असता तेथे मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरून रहिवाशांनी पूल बंद होऊ दिला नाही. या पुलाच्या कामात १९ इमारती बाधित होणार होत्या, मात्र त्यानंतर पुलाच्या संरेखनात काही बदल करण्यात आले आणि १९ ऐवजी केवळ दोनच इमारती कामात बाधित होणार असल्याचे जाहिर केले. मात्र त्या दोन इमारतीतील रहिवाशांच्या योग्य पुनर्वसनासंबंधी ठोस निर्णय न घेण्यात आल्याने तसेच पुलालगतच्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी न लागल्याने रहिवाशांनी पुलाच्या कामास तीव्र विरोध केला आहे. अशात अद्यापही पुनर्वसनाचा, समूह पुनर्विकासाचा मुद्दा निकाली लागलेला नाही. त्यामुळे रहिवाशांची आक्रमक भूमिका कायम आहे.

एप्रिलमध्ये पूल बंद करता न आल्याने उन्नत रस्त्याच्या कामाला त्याचा फटका बसत आहे.प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर हा पूल बंद करण्यास परवनागी देण्याची मागणी एमएमआरडीएकडून आॅगस्टमध्ये करण्यात आली. त्यानुसार अनंत चतुर्दशीनंतर, १० सप्टेंबरच्या रात्रीपासून प्रभादेवी पूल बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले होते. तेव्हा १० सप्टेंबरला पूल बंद होणार का याविषयी वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती न देता एमएमआरडीएकडे विचारणा करण्यास सांगितले.

एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. असे असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार हा पूल बंद करण्यासंबंधी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.