मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तीन दिवसांअगोदर म्हणजेच शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर, अकोलापर्यंत माघार घेतली होती. त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला होता.

दरम्यान, मोसमी वाऱ्यांची दक्षिणसीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, केओंझारगड, सागर बेट, गुवाहटी येथे आहे. पुढील दोन तीन दिवसांत मोसमी पाऊस तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील र्जायंच्या उपर्वरीत भागांतून माघारी जाण्याची शक्यता आहे.

मोसमी पावसाने संपूर्ण गोवा , झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तसेच बिहारमधील काही भागांतून माघार घेतली आहे. तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राज्याच्या अनेक भागांतून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. पुढील एक दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उरलेल्या भागातून तसेच ईशान्य राज्यांतून मोसमी पाऊस माघार घेण्याची शक्यता आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. राज्यातून सरासरी पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरु होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशीराने मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

राज्यात पावसाची शक्यता

आंध्र प्रदेश, तामिळनाडून आसाम आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे वातावरमात आर्द्रतेचे प्रमाण वाढाले आहे. आर्द्रता वाढून वारे महाराष्ट्राकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवसी रत्नागिरीत सर्वाधिक तापमानाची नोंद

रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तेथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तेथे रविवारी देखील तापमानाचा पारा ३५ अंशापार होता. त्याखालोखाल ब्रह्मपुरी येथे ३४.४ अंश सेल्सिअस, अकोला ३३.३ अंश सेल्सिअस, अमरावती ३४.२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मुंबईतही तापमानाचा पारा चढाच

मोसमी पाऊस मुंबईतून माघारी जाण्याअगोदरच पावसाने मुंबईत उघडीप दिली होती. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली. गेले अनेक दिवस मुंबईकरांना उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमावारी ३२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कामाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी वाढ झाली होती.

गेल्यावर्षीचा परतीचा पाऊस (कंसात नियोजित वेळ)

२३ सप्टेंबर- दक्षिण राजस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरु (१७ सप्टेंबर)

५ ऑक्टोबर- महाराष्ट्रातून (नंदूरबार) परतीचा प्रवास सुरु ( ५ ऑक्टोबर)

१५ ऑक्टोबर संपूर्ण देशातून माघार (१५ ऑक्टोबर)