Vashi to Panvel Local Train: हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल १३ तासांहून अधिक काळ बंद होती. त्यानंतर हार्बर मार्गावरील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास झालेल्या या व्यत्ययामुळे वाशी, बेलापूर, नेरुळ आणि पनवेल सारख्या प्रमुख स्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले होते. आज सकाळी ६.०९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाशी-पनवेल लोकल सुरू झाली. मात्र, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक होता. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. मेगाब्लॉकनंतरही दुपारी ४.३० वाजता वाशी ते पनवेल लोकल सेवा सुरू होत नसल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. बराच वेळ लोकल स्थानकात दाखल न आल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्याचे नियोजन रद्द करावे लागले. तांत्रिक कारणास्तव लोकल सेवा बंद असल्याचे रविवारी सायंकाळी मध्य रेल्वेने घोषित केले.
तांत्रिक बिघाड कुठे ?
हार्बर मार्गावरील सीवूड्स दारावे आणि नेरूळदरम्यान तांत्रिक बिघाड झाला. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा वाशी ते पनवेलदरम्यान ठप्प झाली. या मार्गावर मेगाब्लॉक असल्याने सकाळपासून लोकल सेवा बंद होती. त्यामुळे अनेकांनी सायंकाळी बाहेरची कामे करण्याचे नियोजन केले होते. मात्र, दुपारी ४.३० वाजल्यापासून तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मध्य रेल्वे काय म्हणते ….
हार्बर मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि सकाळी ६.०९ वाजल्यापासून वाशी आणि बेलापूर दरम्यानची लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. आता सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा सामान्यरित्या सुरू आहे.
प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
लोकल बंद राहिल्याने रस्ते वाहतुकीवर ताण आला. त्यामुळे बसची गर्दी वाढली, रिक्षा-टॅक्सी थांब्यावर लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांकडे पास असूनही त्यांना आर्थिक ताण सहन करून बस, रिक्षा तसेच टॅक्सीने प्रवास करावा लागला.
देखभाल-दुरुस्तीची ट्रेन घसरली ?
रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे ‘तांत्रिक बिघाड’ हे कारण असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात देखभाल-दुरुस्तीसाठी वापरली जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्याने हा व्यत्यय आला असावा, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मध्य रेल्वे प्रशासनाने दिली नाही.