अकोला : कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी गेले असताना घरातील एकटीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पाच राज्यात पाच हजार कि.मी.चा प्रवास करून नराधम आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशमधील इंदूर येथून अटक केली. या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल असून याने याच वर्षात यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीला अटक केले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणपती विसर्जनाच्या दिवशी ६ सप्टेंबरला अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. आरोपी तौहिद खान समीर खान बैद (वय २८ वर्ष, रा.खैर मोहम्मद प्लॉट) याने पीडितेच्या घरात प्रवेश करून चाकुच्या धाकावर अत्याचार केला. या प्रकरणात डाबकी रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार करून वेगवेगळ्या राज्यात रवाना करण्यात आले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुजरातमधील सुरत राज्यात गेले. आरोपीच्या नातेवाईकांकडे शोध घेतला. आरोपीने त्याचा मोबाईल बहिणीच्या घरी सोडून तेथून पळ काढला. आरोपीचा शोध घेणे आव्हानात्मक होते.

आरोपी अहमदाबाद येथे गेल्याचे कळल्यावर पथकही त्याठिकाणी दाखल होऊन नातेवाईकांकडे विचारपूस केली. आरोपी त्याठिकाणावरूनही पसार झाला होता. आरोपी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने विमानाने ते ठिकाण गाठून आरोपीचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. आरोपीच्या हालचालीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने तो मिळून आला नव्हता. तपासादरम्यान आरोपी हा इंदूर (मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स.पो. नि. गोपाल ढोले, अंमलदार शेख हसन, एजाज अहेमद, मोहम्मद आमीर यांनी तत्काळ इंदूर गाठून आरोपीचा शोध घेतला. मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली.

या प्रकरणात पोलीस पथकाने पाच राज्यांमध्ये पाच हजार कि.मी.चा प्रवास करून २५० सीसीटीव्ही तपासले. १२ रेल्वे गाड्यांची देखील तपासणी केली. या प्रकरणात १० अधिकारी व ४० कर्मचारी तपासासाठी नियुक्त होते. या आरोपीविरूद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. याच वर्षी त्याने यापूर्वी रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे असे पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी सांगितले.

पाच दिवसांत १३ शहरांचा प्रवास

आरोपी रेल्वे व बसने सतत प्रवास करून भुसावळ (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), अहमदाबाद (गुजरात), दिल्ली, आग्रा (उत्तरप्रदेश), झांसी (उत्तरप्रदेश), भोपाळ (मध्यप्रदेश), गुना (मध्यप्रदेश), ललीतपुर (उत्तरप्रदेश), शिवपुरी (मध्यप्रदेश), उज्जैन (मध्यप्रदेश), देवास (मध्यप्रदेश) व इंदौर (मध्यप्रदेश) या मार्गाने प्रवास करीत होता. प्रत्येक ठिकाणी स्था.गु.शा.च्या पथकाने रेल्वेस्थानक व बसस्थानक, दर्गा, मंदिर आदी ठिकाणी तपासणी केली.