अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवक्ते पदावरून पायउतार होताच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांचा कार्यकर्ता म्हणून मी नशीबवान असून आपल्याकडे त्यांच्या विचारांचा प्रचारक म्हणून सर्वोच्च पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या या वक्तव्यांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून वादग्रस्त विधाने न करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्यानंतरही फारसा बदल न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे पाऊल उचलले.

आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली. राष्ट्रवादीने नव्या प्रवक्तांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. या यादीत अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे या दोघांची गच्छंती केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.

पार्थ पवार जमीन प्रकरण यासह विविध कारणांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षातीलच आमदार व पदाधिकाऱ्यांकडून वादग्रस्त विधान करण्यात येत असल्याने अनेक वेळा पक्ष कोंडीत सापडतो. त्यामुळे पक्षाने कठोर पावले उचलत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये प्रवक्ते पदावरून आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी केली. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये अनेकवेळा तणाव निर्माण होत होता. याशिवाय पक्षाचेच आमदार संग्राम जगताप यांच्यावरही अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावरून पक्षातीलच आमदारांमध्ये मोठे मतभेद समोर आले होते.

प्रवक्ते पदावरून पायउतार झाल्यावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘हकालपट्टी आणि उचलबांगडी शब्द माध्यमांनी चवीने लावले. याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून आले नाही. नव्या प्रवक्त्यांच्या यादीत माझे नाव नाही, सध्या प्रवक्ता नाही, हे खरे आहे. विधान परिषदेचा सदस्य आहे. अजित पवारांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता आहे. अजित पवार यांचा कार्यकर्ता असायला नशीब लागतं, तितका नशीबवान मी आहे.’

दुनिया दौडनेवालों की….

आपल्या एक्स खात्यावर अमोल मिटकरी यांनी ‘दुनिया दौडनेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है!’ अशी पोस्ट केली आहे.