अमरावती : आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्या अकरा जणांना अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील ब्राह्मणसभा भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा, हरियाणा पोलीस, नागपूर पोलीस गुन्हे शाखा आणि अमरावती ग्रामीण पोलीसांच्या संयुक्त पथकाने २ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ही अत्यंत गोपनीय आणि नाट्यमय कारवाई केली.
विदेशात बसून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या एका टोळीचे सदस्य परतवाडा येथे दडल्याची गोपनीय माहिती मुंबई गुन्हे शाखेने अमरावती ग्रामीण पोलीसांना दिली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांनी तातडीने पथकासह परतवाडा गाठले. नागपूर गुन्हे शाखेचे पथकही अमरावती पोलीसांच्या मदतीला आले.
दरवाजा तोडून घरात प्रवेश; हवेत गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या टोळीशी संबंधित काही सदस्य ब्राह्मणवाडा भागातील एका घरात लपले होते. संशयित पळून जाण्यापूर्वीच पोलीस पथकाने त्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. या वेळी अमरावती ग्रामीण पोलीसांकडून हवेत एक गोळी देखील झाडण्यात आली, असे सांगीतले जात आहे.
ताब्यात घेतलेल्या ११ पैकी एक जण हरियाणा आणि विदेशातून चालवल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. उर्वरित १० जणांची टोळी नेमकी परतवाडा येथे येऊन कोणती गुन्हेगारी कारवाई करणार होती, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
कसून चौकशी सुरू
ताब्यात घेतलेल्या ११ पैकी सात जणांची चौकशी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे. उर्वरित चौघांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी मुंबईसह अकोला येथील एटीएसचे पोलीस पथक देखील परतवाड्यात पोहोचले. अमरावती ग्रामीण पोलीस आणि नागपूर गुन्हे शाखेचे पथक त्यांना तपासात सहकार्य करत आहे. पोलीसांनी या कारवाई दरम्यान शस्त्रे देखील जप्त केल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, ११ संशयीतांना ज्या घरातून ताब्यात घेण्यात आले, त्या घरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून काही लोक दर सहा महिन्यांत १० ते १२ जणांसह येऊन आयुर्वेदिक औषधी किंवा तत्सम वस्तू विकण्याचा व्यवसाय करत असत. यातील मुख्य सूत्रधार गुरूवारीच परतवाड्यात दाखल झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीनुसार, नागपूर गुन्हे शाखा आणि मुंबई गुन्हे शाखेने अमरावती ग्रामीण पोलीसांना संशयीतांना ताब्यात घेण्याची सूचना दिली होती.