अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या ८ जूनपासून गुरूकूंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
राजू शेट्टी म्हणाले, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरीही या निर्दयी सरकारला जाग येत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीत खुल्या बाजारात विकावे लागले. क्विंटलमागे हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. जर उद्योगपतींना पाम तेल आयात करण्यासाठी सूट दिली नसती, तर सोयाबीनला चांगले भाव मिळाले असते. पण, हे सरकार उद्योगपतींचे आहे. आम्ही काही अशक्य अशा मागण्या केल्या नाहीत. त्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नये. आम्हालाही आता निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. येत्या १४ जूनपर्यंत सरकारने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास राज्यात चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही. कडेकोट बंद पुकारला जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली, ते म्हणाले, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुर्तिजापूरच्या प्रचार सभेत घोषणा केली होती. पण, त्याचे पुढे काय झाले. अजित पवार म्हणतात, राज्याची आर्थिक स्थिती ठिक नाही. पण, याच अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी वाहनातला एसी बिघडला म्हणून गाड्या बदलण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. एकवेळ बुलेट ट्रेनचे काम थांबवा, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी आमची मागणी आहे. तीही पूर्ण करणार नसाल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले.
राजू शेट्टी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, बावनकुळे यांना वाळू माफियाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हेलिकॉप्टर घेऊन जाता येते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंची साधी भेट घेता येत नाही. त्यांना याची लाज कशी वाटत नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला.