Nagpur Farmers Protest : माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपूर-वर्धा मार्गावर ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाने संपूर्ण परिसर ठप्प झाला होता. रात्री उशिरा घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईला जाण्याचे मान्य केले.
राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत रस्त्यावरून नियोजित मैदानावर स्थलांतर केले. रात्री अधूनमधून झालेल्या पावसात आंदोलक भिजले; काहींनी आजूबाजूच्या हॉटेल, ढाबे आणि मंगल कार्यालयात आश्रय घेतला, तरीही बहुसंख्य आंदोलक ठिकाणीच ठाम राहिले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले की, “पावसातही आंदोलन सुरूच राहील. आमच्यापैकी काही प्रतिनिधी दुपारी १२ वाजता विमानाने मुंबईला जात असून संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत कर्जमाफीसह शेतकरी प्रश्नांवर चर्चा होईल. त्या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल.”
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.
कार्यकर्त्यांनी “सरकार जागे व्हा”, “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले. या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या संख्येमुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण राहिली.
बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, “शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास असे आंदोलन राज्यभर उग्र होईल.” प्रशासनाने शांतता राखावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ट्रॅक्टर–बैलगाडा मोर्चा नागपूरवर धडकला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. वर्धा मार्गावरील पांजरा वळण रस्त्यावर हजारो शेतकरी मागील दोन दिवसांपासून ठिय्या देऊन बसले आहेत. काल रात्री बच्चू कडू स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर झोपले, तर आज सकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
“उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही, पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहायचं ठरवलंय का? मग तयार राहा — आता भगतसिंगगीरी सुरू होईल!” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला.
या आंदोलनामुळे नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलक काल रात्रभर रस्त्यावर झोपले आणि आज सकाळी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची मागणी करत कालपासून नागपुरात ट्रॅक्टर–बैलगाडा मोर्चा धडकला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी वर्धा मार्गावर पांजरा वळण रस्त्यावर आंदोलन करत आहेत. आज सकाळीही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. राष्ट्रीय महामार्ग मात्र वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या आंदोलनामुळे नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा दिशेकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
