अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १३८ किलोमीटरची पदयात्रा काढली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही या पदयात्रेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे सोमवारी १४ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा येथे आयोजित समारोपीय सभेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे.

देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला गेल्या ७ जुलै पासून सुरुवात झाली. चिलगव्हाण या स्व. साहेबराव करपे यांच्या गावामध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती. सुमारे १३८ किमीच्या या यात्रेत शेतकरी, विविध पक्षातील कार्यकर्ते भर पावसातही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे गुरूवारी १० जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील हे देखील सोमवारी सकाळी ११ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे होणाऱ्या समारोपीय सभेला उपस्थित राहणार आहेत.

डोळ्यावर बांधली पट्टी

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी बच्चू कडू यांनी काढलेल्या पदयात्रेचा आजचा सातवा दिवस आहे. आज बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी डोळ्याला काळ्या पट्टया बांधून अंबोड्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. सरकारने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे. त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतीकात्मक आंदोलन करीत आहोत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

शेतमालाला हमीभाव नाही, मागील कर्ज थकलेले त्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही, सावकारी जाच आणि बँकांच्या नोटिसांचा विळखा, सरकारकडून आश्वासने, पण कृती शून्य यामुळे शेतकरी आज दुहेरी संकटात भरडला जातोय. नैराश्य, अपमान, कुचंबणा आणि शेवटी आत्महत्येची विवशता हाच भाजप सरकारच्या काळातील शेतकऱ्यांचा जीवनक्रम बनलेला आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर करून दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.