चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना चंद्रपूर जिल्ह्यात केवळ बॅनर, पोस्टर व होर्डिंगपुरती मर्यादित ठरली आहे. जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे या दोघांशिवाय तिसरा नेता या पक्षाशी जुळलेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत एकही मोठा नेता किंवा मोठा कार्यक्रम शिंदे गटाला घेता आला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ४० आमदार व १२ खासदार आहेत. बाळासाहेबांची शिवसेनाचे नेतृत्व शिंदे करत आहेत. मात्र या जिल्ह्यात शिंदे यांना अतिशय अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. केवळ बॅनर, पोस्टर व होर्डिंगपुरती शिंदेसेना या जिल्ह्यात कार्यरत आहे, असे म्हणायला हरकत नाही. चंद्रपूरचे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शिंदे सरकारमध्ये सहभागी आहेत. अर्थात आमदार जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरूनच शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याची पुष्टी सरकार स्थापनेच्या वेळी केली होती. त्यामुळे आमदार जोरगेवार आता किंवा भविष्यातही शिंदेसेनेत सहभागी होण्याची सुतराम शक्यता नाही.

हेही वाचा – नागपूर : ‘जी-२०’ च्या पाहुण्यांसाठी रस्ते होणार गुळगुळीत

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास असलेल्या नितीन मत्ते शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांची शक्ती अतिशय मर्यादित आहे, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेले बंडू हजारे शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत. मत्ते-हजारे या दोन नावांशिवाय तिसरे प्रमुख नाव शिंदे शिवसेनेकडे नाही. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे सध्या तरी या जिल्ह्यात अस्तित्व नाही. येत्या काळातही काही प्रमुख नेते शिंदे शिवसेनेशी जुळतील, अशी शक्यता कमीच आहे.

हेही वाचा – ‘एसटी’ बस दुरुस्तीसाठी वस्तूसाठा नसल्यास कारवाई

शिंदे गट रस्त्यावर किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातूनही या जिल्ह्यात सक्रिय दिसत नाही. वरोरा, भद्रावती या दोन तालुक्यांत रक्तदान शिबीर व फळ वाटप या छोट्या कार्यक्रमाशिवाय तिसरा कार्यक्रम शिंदे गटाचा दिसला नाही. वरोरा येथील जुगार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मत्ते यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केल्याने तसेही शिंदे गटाशी जुळण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे आगामी काळात शिंदे शिवसेना या जिल्ह्यात केवळ नावापुरती राहील, असेच चित्र येथे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb shiv sena is limited to only banners and posters in chandrapur district rsj 74 ssb