महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने बस दुरुस्तीसाठी  आवश्यक वस्तूसाठा नसल्यास विभागीय भांडार अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्रात सगळ्या भांडारगृहात एक ते अडीच महिन्यापर्यंत पुरेल एवढा वस्तूसाठा ठेवण्याचेही नमूद आहे.

हेही वाचा >>> नागपूर : ‘जी-२०’ च्या पाहुण्यांसाठी रस्ते होणार गुळगुळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यभरातील अधिकाऱ्यांची विभागनिहाय अ व ब गटाच्या वस्तूसाठ्याबाबत बैठक घेतली. विभागीय भांडारात गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऐनवेळी स्थानिक खरेदी केल्याने बऱ्याच वस्तू महाग दरात घ्याव्या लागतात. त्यामुळे आता अ गटाच्या म्हणजे ‘क्लचप्लेट’सह इतर महागड्या वस्तूंसाठी प्रत्येक विभागाला १ ते २ महिने पुरेल एवढा वस्तूसाठा ठेवण्याचे आदेश दिले. पुरवठादारांची देयके वेळेवर अदा न झाल्याने साहित्याचा पुरवठा थांबतो. त्यामुळे भांडारगृहात किमान वस्तूसाठा नसतो. काही कालावधीनंतर साहित्य निरंक होऊन एसटी बंद राहते. या स्थितीत बऱ्याचदा जादा दरात खरेदी होऊन महामंडळाचा खर्च वाढतो. पुरवठादारांचे देयक वेळेत देण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांची आहे. त्यासाठी विभाग नियंत्रकांनी दर महिन्याला वस्तूसाठा नियंत्रण बैठक घेऊन त्याचा अहवाल भांडार व खरेदी खात्यास सादर करण्याचेही आदेशात नमूद आहे.