नागपूर: काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना रामटेकची लोकसभेची उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न फसला असला तरी पारवे यांना भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना रामटेकची निवडणूक लढवायला सांगण्यात आले आहे. आता पारवे हे सेनेचे रामटेकमधून उमेदवार असणार आहे. उमेदवार भाजपचा आणि लढणार सेनेच्या धनुष्यबाणावर असे चित्र निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभा मतदार संघातून सलग दोन वेळा शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आले आहेत. शिवसेना पक्षात फुट पडल्यावर कृपाल तुमाने एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. लोकसभा निवडणूकीसाठी तुमाने रामटेकची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होते. पण सेनेत फूट पडल्यावर या पक्षाची ताकद कमी झाल्याचे कारण देऊन भाजपने या जागेवर दावा केला होता. यासाठी भाजपने उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन रामटेकमधून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे कृपाल तुमाने यांच्या समर्थनाथ नागपूर- रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते.

हेही वाचा…बच्‍चू कडू महायुतीतून बाहेर पडण्‍याची शक्‍यता, अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत देण्‍याची घोषणा

मात्र एकनाथ शिंदे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिल्याने भाजपने त्यांना तृमाने ऐवजी पारवे यांना उमेदवारी द्यावी, ते सेनेत प्रवेश करतील असे सांगितले. त्यानुसार रविवारी पारवे यांनी सेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यांना रामटेकमधून लोकसभेची उमेदवारीही घोषित झाली आहे. राजू पारवे यांना उमेदवारी निश्चित झाली असली तरी येथील विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने हे पारवे यांना मदत करतील काय? हे आता येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s attempt to field umred mla raju parve in ramtek lok sabha fails parve to contest from shiv sena mnb 82 psg