चंद्रपूर : काँग्रेस नेत्यांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी भाजप नेत्यांशी हातमिळवणी केल्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजप नेत्यांचा विजय झाला. कालपर्यंत एक संचालक असलेल्या भाजपचे आज नऊ संचालक निवडून आले. त्यामुळे अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया आणि उद्धव ठाकरे सेनेचे रवींद्र शिंदे एकत्र आले. आमदार भांगडिया यांच्या पुढाकाराने खासदार धानोरकर महिला गटातून बिनविरोध निवडून येताच त्यांनी रंग बदलण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात विधानसभा व मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने आवाज उठवणारे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना आघाडीत घेण्यास कुणीच तयार नव्हते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचीही कोंडी झाली होती. परिणामी जोरगेवार, वडेट्टीवार यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागी. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्याने धोटे यांना अखेरच्या क्षणी बंधू शेखर धोटे यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली.

या सर्व घडामोडींनंतर धानोरकर, वडेट्टीवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष धोटे आषाढी एकादशीच्यानिमित्ताने विठ्ठलाच्या साक्षीने एकत्र आले खरे, मात्र तोपर्यत बराच वेळ निघून गेला होता. याचदरम्यान भांगडिया आणि जोरगेवार यांनी एकत्र येत काँग्रेस संचालकांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकण्यास सुरूवात केली. गजानन पाथोडे हे एकमेव संचालक आजवर बँकेत भाजपचा किल्ला लढवत होते. मात्र भांगडिया, जोरगेवार यांनी काँग्रेसच्या नंदा अल्लूरवार, संजय डोंगरे, यशवंत दिघोरे यांना भाजपवासी करून घेतले. अशा पद्धतीने पाथोडे, सुदर्शन निमकर, डोंगरे, अल्लूरवार, दिघोरे, आवेश खान पठाण, गणेश तर्वेकर, निशिकांत बोरकर व ललित मोटघरे, असे भाजपचे नऊ संचालक निवडून आले.

विरोधकांना मतांचा आशीर्वाद अन् जोगवा

भाजपचे माजी आमदार निमकर यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांनी मतांचा आशीर्वाद दिल्याने ते राजुरा तालुका अ गटातून निवडून आले. धोटे यांच्या आशीर्वादामुळेच आपण निवडून आलो, अशी प्रतिक्रिया निमकर यांनी स्वत: दिली. धोटे यांनी निमकर यांचेही पेढे भरवून तोंड गोड केले. खासदार धानोरकर यांनी राजुरा येथे भाजपचे नागेश्वर ठेंगणे यांच्यासाठी मतांचा जोगवा मागितला. ओबीसी गटातून अवघ्या दोन मतांनी पराभूत झालेले श्यामकांत थेरे भद्रावती तालुक्यात मते घेण्यात माघारल्यानेच त्यांचा पराभव झाला.

दावे-प्रतिदावे

भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. येथे काँग्रेसकडे १२, तर भाजपकडे नऊ संचालक आहेत. भाजपचे नेते १० ते ११ संचालक असल्याचा दावा करीत आहेत. मात्र, काँग्रेस नेते उल्हास करपे, रोहित बोम्मावार या दोन संचालकांसह एकूण १२ संचालकांना घेवून पर्यटनाला गेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कुणाचा बसणार, हे कोडेच आहे.