नागपूर : रविवारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपच्या विदर्भातील आमदारांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप नागपूर महानगर व जिल्हा यांच्या वतीने क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदारांची उपस्थिती होती. यावेळी नितीन गडकरी यांनी हिंदू, हिंदुत्व, भारतीय जीवन पद्धती आणि सेक्युलर शब्दावरून महत्त्वाचे विधान केले, तसेच सेक्युलर शब्दाचा अर्थही सांगितला. यामुळे राजकीय वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व

गडकरी म्हणाले, हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू जीवनपद्धती यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु, भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हाच विचार अटलजींनी मांडला. हिंदुत्वाचा खरा अर्थ भारतीयत्वाशी निगडित आहे. आपल्या समाजात उपासना पद्धती वेगळ्या आहेत. मात्र, सगळे भारतीय आहेत. जावेद अख्तर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची एकदा मुलाखत घेतली होती. त्यात हा देश ‘सेक्युलर’ राहायला नको का? असा प्रश्न केला. यावर अटलजींनी उत्तर दिले की, हा देश ‘सेक्युलर’ आहे आणि कायम राहील. परंतु तो काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे नाही तर या देशातील हिंदू समाजामुळे. कारण त्यांची सहनशीलता, सर्वसमावेशकता, संस्कृतीमुळे हा देश कायम ‘सेक्युलर’ राहणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या कार्याचा गौरव केला.

हेही वाचा : नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राचा कायापालट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

गडकरींनी असा सांगितलं सेक्युलरचा अर्थ

भारतीयत्व आणि हिंदुत्व एकच आहे. आपल्या देशात ‘सेक्युलर’ शब्दाचा बराच प्रचार केला गेला. मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतांसाठी ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर झाला. परंतु, ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा नसून सर्वधर्मसमभाव असा आहे. शब्दकोषामध्येही हाच अर्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. काही देशात युद्ध सुरू आहेत. आज सर्वांना बुद्धाची गरज आहे. जेवढा आदर आम्हाला भगवान श्रीरामांबद्दल आहे तेवढाच भगवान गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि अल्लाहबद्दल आहे, असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा : अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?

फडणवीस महाराष्ट्राचे भविष्य बदलणार

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा होती. सत्कारामागे भविष्यकाळातील अपेक्षा दडलेल्या असतात. जात, पंथ, धर्माच्या वर जाऊन राज्याचा विकास करा. राजकारणात अनेक चढ उतार येतात. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. या महाराष्ट्राचा शेतकरी, शेतजूर, दलित, आदिवासी यांचे जीवन सुसज्ज बनवायचे आहे. जातीयवादापासून महाराष्ट्र मुक्त करायचा आहे. फडणवीसांचे कर्तृत्व हे महाराष्ट्राचे भविष्य बदलणार, अशा शब्दात गडकरींनी त्यांचे कौतुक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari on secularism word meaning constitution of india dag 87 css