अकोला : सणासुदीनिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूर-पुणे दरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळे नागपूर ते पुणेच्या दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

भारतीय रेल्वेकडून दिवाळी व छठ पूजा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण १२ हजार ०११ विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. या सण विशेष गाड्यांमुळे कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली. देशभरातील विविध ठिकाणांसाठी सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मध्य रेल्वेच्यावतीने २७ ऑक्टोबर रोजी एकूण २३ विशेष गाड्या चालवल्या जातील. त्यापैकी १४ विशेष गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. यामध्ये नागपूर-पुणे, पुणे-नागपूर, नागपूर-हडपसर आदी गाड्यांचा समावेश आहे.

गाडी क्र. ०१४०९ पुणे – नागपूर विशेष पुणे येथून २०.३० वाजता सुटेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा राहील. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.

गाडी क्रमांक ०१४०२ नागपूर – पुणे विशेष नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा आहे. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, तेरा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहील.

गाडी क्र. ०१२०१ नागपूर – हडपसर विशेष नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरली येथे थांबा राहील. चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान आणि सहा सामान्य द्वितीय श्रेणी अशी गाडीची संरचना राहणार आहे.