नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेले नागपूरचा विस्तार होत आहे, आता फडणवीस यांनी नवीन नागपूर साठी एक संकल्पना मांडली असून ती साकार करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असलेली नवरत्न दर्जाची आर्थिक सार्वजनिक कंपनी एनबीसीसी (इंडिया) लि. यांच्यात नवीन नागपूर या उदयोन्मुख नवनियोजित आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एनबीसीसी (इंडिया) लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी, एनएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मीणा आय.ए.एस. तसेच इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

नवीन नागपूर या नव्याने संकल्पित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वितीय केंद्राचा विस्तार सुमारे १,७१० एकरांवर होणार आहे. त्यापैकी १,००० एकरांवर विकास केला जाणार असून ७१० एकर भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. नवीन नागपूरचा विकास ‘प्लग-अॅड-प्ले’ मॉडेलवर आधारित असणार असून, यात आधुनिक सुविधांचा समावेश असेल जसे की समाकलित भूमिगत उपयुक्तता टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, स्वयंचलित कचरा संकलन व वर्गीकरण प्रकल्प. हा प्रकल्प स्टार्ट-अप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उ‌द्योग, आयटी कंपन्या आणि व्यावसायिक कार्यालयांसाठी व्यावसायिक केंद्रांसह रहिवासी व मिश्र वापर विकासावर लक्ष केंद्रित करेल, तसेच नगर नियोजन मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविला जाईल.

एनबीसीसीची नियुक्ती

१,००० एकरांच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार संस्था म्हणून करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील १५ वर्षांत तीन टप्प्यात हाती घेतला जाईल. यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या सक्षम समितीचे अध्यक्ष एनएमआरडीएचे आयुक्त असतील. या समितीत एनएमआरडीए व एनबीसीसीचे सदस्य सहभागी राहून नियोजन व अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील. हा सामंजस्य करार नवीन नागपूरला एक नवे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वितीय केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यातून नागपूर हे भविष्यात महाराष्ट्रातील महत्वाचे आर्थिक व व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येईल. या प्रकल्पाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मान्यता ३ सप्टेंबर २०२५ रोजी मिळाली आहे.