अकोला : अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आता ‘एसीबी’ने आमदारांचे पाल्य शिक्षण घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावून त्यांच्या शैक्षणिक खर्चाची माहिती मागवली. हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून त्यावरून सरकारवर टीका केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर बेहिशोबी मालमत्ताचे आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. अमरावती एसीबीकडून बेहिशेबी मालमत्ताच्या आरोप प्रकरणात १७ जानेवारी रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील हालचाली मंदावल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार नितीन देशमुख यांच्या भोवती चौकशीचा समेमिरा सुरू झाला. निवडणुकीच्या तोंडावर एसीबीकडून सखोल चौकशी करण्यात येत असल्याने आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. अमरावती एसीबीकडून आमदार देशमुख यांच्या कुटुंबाची देखील माहिती घेऊन चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: “देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला

अमरावती परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांनी ४ जुलैला अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलच्या मुख्यध्यापकांना पत्र पाठवून आमदार नितीन देशमुख यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काची माहिती मागवली. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची उघड चौकशी केली जात आहे. त्यांचे पाल्य पृथ्वी देशमुख व जान्हवी देशमुख अनुक्रमे १० वी आणि आठव्या वर्गात शिकतात. आमदार नितीन देशमुख यांनी मुलांच्या शिक्षणावर शाळेत प्रवेश घेतल्यापासून आतापर्यंत आकारण्यात आलेल्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची माहिती एसीबी कार्यालयात तत्काळ सादर करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा: विधानसभा निवडणूक : भाजपसोबत असणारा तेली समाज उमेदवार पाडण्याचा इशारा का देतो आहे?

अकोला जि.प.कडूनही मागवली माहिती

अमरावती एसीबीने अकोला जिल्हा परिषदेला देखील पत्र देऊन आमदार नितीन देशमुखांविषयीची माहिती मागवली. आमदार नितीन देशमुख हे २००९ ते २०१९ या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात काही गैरप्रकार झाला का? याची खातरजमा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola acb seeks details of education of uddhav thackeray shivsena mla nitin deshmukh s son ppd 88 css