नागपूर : बटन दाबले आणि लगेच समस्या सुटली, असे राजकारणात होत नाही. त्यासाठी चर्चेतून तोडगा काढावा लागणार आहे. वरच्या पातळीवर नाराजी दूर झाली असली तर खालच्या पातळीवर ज्या काही समस्या आहेत त्या सोडवत मार्ग काढला जाईल. मात्र तीनही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, असे मत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.

माढा मतदार संघाच्या संदर्भात रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माढा मतदार संघाबाबत चर्चा केली. भेटीनंतर रणजिंतसिंह निंबाळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची चर्चा आहे. परंतु, फडणवीस व अजित पवार महाराष्ट्राची नस ओळखणारे नेते आहेत. त्यांचा तळगाळापर्यंत संपर्क आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील समन्वय योग्य पद्धतीने होऊन ते अधिक मजबूत होणार असल्याचे निंबाळकर म्हणाले. माढाची जागा शरद पवार यांनी लढवलेली असल्यामुळे राष्ट्रवादीची आक्रमकता जास्त असते. पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षातील नेते सोडवतील, असेही निंबाळकर म्हणाले.

हेही वाचा : यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…

प्रमुख कार्यकर्ते कामाला लागले – राहुल कुल

माढा आणि बारामती या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे संबंध अधिक चांगले असले पाहिजे त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज नागपुरात आलो. महायुतीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते कामाला लागले असून ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याचे राहुल कुल म्हणाले. माढा आणि बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, असेही ते म्हणाले.