नागपूर : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दीपक कापसे यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. काँग्रेसच्या देवडिया भवनात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत कापसे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
कापसे यांच्यासोबत माजी नगरसेवक नाना झोडे, शिवसेनेचे संघटक श्रीकांत कैकाडे, विभाग प्रमुख रमेश अंबर्ते, अंगद हिरोंदे आणि उपविभाग प्रमुख गोलू गुप्ता यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या हालचालीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
दीपक कापसे हे मूळचे काँग्रेसचेच कार्यकर्ते असून त्यांनी दोन कार्यकाळ नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. मात्र २०१७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत पक्ष सोडला आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला. सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक असलेल्या कापसे यांच्या परतीमागे चतुर्वेदी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे बोलले जाते.
महाविकास आघाडीच्या काळात चतुर्वेदी यांचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेतून विधानपरिषदेवर पाठवण्यात आले होते. त्याच काळात कापसे यांनीही सेनेत प्रवेश केला होता. मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी हे शिंदे गटात गेले, तर कापसे उद्धव ठाकरे गटात राहिले. आता पुन्हा काँग्रेसमध्ये परत येत त्यांनी स्थानिक राजकारणात नवा बदल घडवून आणला आहे.
कापसे हे नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त राहिले असून त्यांचा जनसंपर्क भक्कम आहे. त्यांच्या परतीमुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर बळ मिळेल, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. येत्या नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांदरम्यान कापसे यांची घरवापसी काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकते, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
