नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संघाच्या तत्कालीन सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह, म्हणजेच रज्जू भैया यांचे आपल्या जीवनावर झालेले परिणाम अधोरेखित करताना संघातील सामाजिक समरसतेचे आणि जातीभेदमुक्त व्यवहाराचे विशेष कौतुक केले.

रामनाथ कोविंद म्हणाले, “रज्जू भैयांच्या संपर्कात आल्यावर मला संघाची खरी ओळख पटली. संघात असलेली समानता, समरसता, आणि ‘जनसेवा’ ही भावना मी प्रत्यक्ष अनुभवली. त्यांनी मला समाजकार्य आणि राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित केले. संघाच्या कार्यपद्धतीत कुठेही जात, धर्म याचे भेद नाहीत, हीच संघाची खरी ताकद आहे.”

ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधीही संघाच्या कार्यप्रणालीने प्रभावित झाले होते. १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्लीतील संघाच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी संघाच्या शिस्त, साधेपणा आणि सेवाभावाचे कौतुक केले होते. गांधी वाङ्मयातही याचे विस्तृत उल्लेख आढळतात. या अनुभवामुळे मला संघाबद्दल आदर निर्माण झाला.”

कोविंद यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “१९९१ मध्ये मी कानपूरमधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मला अनेक स्वयंसेवकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे सर्व स्वयंसेवक निष्ठावान, सेवाभावी आणि जातिभेदापासून पूर्णतः मुक्त होते. त्यांचे समर्पण आणि कामाची निस्वार्थ वृत्ती माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली.”

या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांनी परंपरेला थोडा फाटा देत सुरुवातीलाच कोविंद यांना भाषणासाठी आमंत्रित केले. कोविंद यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यातील ऐतिहासिक संबंध उलगडून सांगितले. त्यांनी १९४० मध्ये कराड येथे आंबेडकरांनी संघाच्या शाखेला दिलेली भेट आणि तेथील सकारात्मक अनुभव शेअर केला.

यानंतर मोहन भागवत यांनी ध्वजारोहण व शस्त्रपूजनाचे विधी पार पाडले. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या सुरक्षेची बदलती गरज, समाजातील समरसता, आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच देश-विदेशातील विशेष निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. शताब्दी वर्ष असल्याने पाहुण्यांसाठी भव्य सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.