नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे आहे आणि जनता ते करून दाखवणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेविषयी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केले केली.
शरद पवारांच्या आज तीन सभा
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपूरमध्ये विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. शरद पवार याचे सकाळी ९ वाजता मुंबईहून आगमन झाले. दुपारी ११ वाजता ते पूर्व नागपूर मतदारसंघात दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ वृंदावननगर येथे सभा घेणार आहेत. दुपारी १२.३० ची वेळ त्यांनी राखीव ठेवली आहे. या वेळेत ते हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे विश्रांती घेणार आहेत. दुपारी दोन वाजता ते तिरोडा येथे सभेसाठी हेलिकॉप्टरने रवाना होतील. तेथील सभा आटोपून ते दुपारी चार वाजता काटोल येथे जाणार आहेत. तेथे त्यांची काटोल बाजार समितीच्या प्रांगणात जाहीर सभा आहे. येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात आहेत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी (श.प) प्रतिष्ठेची आहे. तेथून ते रात्री नागपूरला परत येणार असून तेथे त्यांचा मुक्काम आहे.
हेही वाचा : Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी
शिंदे यांची देवलापारला सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी नागपूरमध्ये येत आहेत. त्यांच्या दक्षिण नागपूर व रामटेक विधानसभा मतदारसंघात सभा आहेत. दुपारी चार वाजता ते रामटेक विधानसभा मतदारसंघातील देवलापार येथे प्रचार सभा घेणार आहेत. शिवसेनेचे (शिंदे) विद्यामान आमदार आशीष जयस्वाल येथून रिंगणात आहेत. रात्री सात वाजता दक्षिण नागपूर मतदारसंघातील तिरंगा चौकात भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा आहे.
हेही वाचा : लोकजागर: रिपब्लिकनांची बोळवण!
जनगणनेच्या मागणीवर पवार नेमके काय म्हणाले?
बुधवारी राहुल गांधी यांनी नागपुरात संविधान सन्मान संमेलन दरम्यान दरम्यान पुन्हा एकदा जातीय जनगणना आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणार अशी घोषणा केली. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून आमच्या पक्षाकडून जातीय जनगणनेची मागणी सातत्याने होत आहे. जनगणना झाल्यास देशातील संपूर्ण समाजाचे चित्र समोर येईल. त्यामुळे जातीय जनगणना होणे अत्यंत आवश्यक आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे हे जातीय जनगणनेनंतरच निश्चित होणार आहे असेही शरद पवार म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd